सोहळा धम्मदीक्षेचा : ...आणि लंडनमध्ये बाबासाहेबांनी मांडली स्वतंत्र भारताची भूमिका

In London, Babasaheb Ambedkar introduced the role of independent India
In London, Babasaheb Ambedkar introduced the role of independent India

नागपूर ः लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक स्तरावरही विद्वानांमध्ये विशेष नोंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन वर्षे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अस्पृश्‍यता व ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढ्याचा निश्‍चय केला. ‘रिस्पॉन्सीबिलीटिज ऑफ रिस्पॉन्सीबल गव्हर्नमेंट इन ब्रिटिश इंडिया’ या शीर्षकाखाली लिहिलेला लेख डॉ. बाबासाहेबांनी लंडन विश्वविद्यालयाच्या सभेत वाचून दाखविला. प्रस्तुत लेखात त्यांनी ब्रिटिश सरकारवर इतकी जोरदार टीका केली होती की, त्यामुळे त्यांचे ब्रिटिश विद्यार्थी मित्र नाराज झालेत. 

बाबासाहेबांची देशभक्ती त्या काळात किती प्रखर होती, हे यावरून दिसते. विद्यार्थी म्हणून आंबेडकर यांनी आपल्या लेखात व्यक्त केलेली मते अगदी स्पष्टपणे एका क्रांतिकारकाची आहेत, असे उद्गार लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍सचे प्रोफेसर हॅरॉल्ड जे. लॉस्की यांनी त्यावेळी काढले होते. ब्रिटिश लायब्ररीत सर्वप्रथम प्रवेश करणारे आणि शेवटून निघणारे विद्यार्थी बाबासाहेबच होते. लंडनच्या वास्तव्यात दरदिवशी अठरा-अठरा तास अभ्यास करून त्यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत लंडनच्या त्यांनी भारतीय म्हणून आपली भूमिका वठविली.

बाबासाहेबांच्या विचाराने प्रत्येक माणसाला माणुसकीचा धर्म सांगितला आहे. जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवला. ते ज्या ठिकाणी गेले, त्या भागात त्यांनी विषमतेला धक्के दिले. त्यांचा पदस्पर्श म्हणजे विषमता आणि भांडवलशाहीला आवाहनच होते. लंडन येथे शिक्षण घेत असताना किंग हेन्री मार्गावरील घरात बाबासाहेब राहत होते. महाराष्ट्र सरकारने ते निवासस्थान खरेदी केले आहे. ही वास्तू तीन मजली आहे. या वास्तूवर ‘सामाजिक न्यायाचे भारतीय शिलेदार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१ ते १९५६) यांनी येथे १९२१-२२ मध्ये वास्तव्य केले’ असे शब्द कोरले आहेत. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी आठवणींचा विदेशातील भव्यदिव्य प्रेरणासंग्रह स्फूर्तिस्थान आहे. 

लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याची बाजू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्‍या प्रभावीपणे व मुद्देसूदपणे मांडली की, भारताच्या स्वातंत्र्याचे खरे कैवारी कोण, अशी चर्चा इंग्लंडमध्ये त्यावेळी बराच काळ चालली होती. याविषयी महात्मा गांधी म्हणाले होते की, डॉ. आंबेडकर, गोलमेज परिषदेमध्ये तुम्ही भारताच्या स्वातंत्र्याची बाजू अगदी सडेतोडपणे मांडली. तुम्ही उत्तम प्रतीचे देशभक्त आहात. आजही बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता किती महत्त्वाची आहे हे कळून येते. 
आज जागतिकीकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.


 राष्ट्रीकरण असलेले उद्योगधंदे भाग भांडवलाच्या स्वरूपात विकल्या जात आहेत. भांडवलशाहीला पोषक वातावरण तयार झाले असून भविष्यात फार मोठे धोके भारतात निर्माण होतील. नव्हे, ती सुरुवात झाली असे वातावरण तयार झाले आहे. भांडवलशाही ही लोकशाहीला मारक आहे. डॉ. आंबेडकर हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या तत्त्वज्ञानात माणूस हा श्रेष्ठ आहे. मार्क्‍सने रक्तरंजित क्रांतीचा विचार सांगितला. मालक आणि मजूर यांच्या रक्तरंजित क्रांतीतून लेनीनच्या नेतृत्वात सत्तापरिवर्तन झाले. 

मार्क्‍सच्या साम्यवादाचे पूर्णपणे समर्थन न करता डॉ. आंबेडकरांना रक्तरंजित क्रांती मान्य नाही. शिवाय, मनुष्याला जीवन जगण्याकरिता फक्त अन्न, वस्त्र व निवाराच नाही तर परिपूर्ण जीवन जगण्याकरिता समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांची जास्त गरज आहे. बुद्धाने हे तत्त्वज्ञान मार्क्‍सच्या हजारो वर्षे आधी सांगितलेले आहे. डॉ. आंबेडकरांनी ते स्वीकारले व जगापुढे ठेवले. म्हणून जग बाबासाहेबांच्या विचारांना अंगीकारते. 

भारतीय लोकशाही ही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही, हे सर्व जगाने मान्य केले आहे. त्या लोकशाहीचा मोठा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान लिहिण्यात बाबासाहेबांनी प्राणाची बाजी लावली. भारतातून हद्दपार झालेला बौद्ध धम्म भारतात पुन्हा रुजविण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  

लेखक ः विलास गजभिये, चंद्रमणी नगर, नागपूर

संपादन  : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com