
खंबित येथील शेतकरी सुधाकर कोहळे यांचा गावाशेजारी जनावरांचा गोठा आहे. गोठ्यात शेतातील पेरणीचे साहित्य, स्प्रिंकलर, पाइप, जनावरांचा चारा, इतर साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जळून स्वाहा झाला.
आष्टी (जि. वर्धा) : आष्टी तालुक्यातील खंबित येथील सुधाकर कोहळे यांच्या गुरांच्या गोठ्याला अनोळखी व्यक्तीने आग लावली. यात जनावरांचा गोठा जळून खाक झाला. तर उमेश कोकाटे यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लावल्याने संपूर्ण तुरीची गंजी स्वाहा झाली. या दोन्ही घटना बुधवारी (ता. 13) मध्यरात्रीदरम्यान घडल्या.
खंबित येथील शेतकरी सुधाकर कोहळे यांचा गावाशेजारी जनावरांचा गोठा आहे. गोठ्यात शेतातील पेरणीचे साहित्य, स्प्रिंकलर, पाइप, जनावरांचा चारा, इतर साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जळून स्वाहा झाला.
शेतकरी सुधाकर कोहळे यांनी दोन बैल व म्हैस मोकळ्या जागेत बांधल्याने गुरे बचावली. पहाटेच्या सुमारास गावाशेजारी आगीचे लोळ व धूर दिसत असल्याचे पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गोठा जळून खाक झाला होता.
अर्ध्या किलोमीटर अंतरावर उमेश कोकाटे यांच्या शेतातून आगीचे लोळ बाहेर पडत असताना ग्रामस्थांना दिसले. तेव्हा दोन एकरांतील तुरीच्या पेट्या असलेली गंजी आगीच्या भक्षस्थानी सापडून स्वाहा झाली होती. एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खंबित गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात उमेश कोकाटे यांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.
संपादन - अथर्व महांकाळ