नोकरी मिळेल म्हणून अल्पवयीन गरीब मुलीने ‘त्या’ दाम्पत्यावर ठेवला विश्‍वास...अन् तब्बल १८ महिन्यांनंतर...वाचा सविस्तर

दशरथ जाधव
Tuesday, 15 September 2020

घरची परिस्थिती नाजूक असल्याने एक अल्पशिक्षित मुलगी नोकरीच्या शोधात होती. तिचा येथील शुक्‍ला परिवारासोबत संपर्क आला. त्यांनी गुजरात राज्यातील सुरत येथे आमचा व्यवसाय असल्याची बतावणी करून चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. मुलीला येथील विठ्ठल वॉर्डातील चेतन ऊर्फ अंकित गौतम याच्या घरी ठेवले. त्या रात्री अंकितने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

आर्वी (जि. वर्धा) : नोकरीचे आमिष दाखवून २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीला सुरत येथे नेले. तेथे गेल्यानंतर भलतेच घडले. नोकरी तर मिळाली नाही. मात्र, वेश्‍या व्यवसायात तिला ढकलले. तिने यातून स्वत:ला मोठ्या शिताफीने सोडवून एका मुलासोबत राहणे सुरू केले. तब्बल १८ महिन्यांनंतर नाट्यमयरीत्या या प्रकरणाच्या चौकशीला दिशा मिळाली आणि पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

 

श्‍यामप्रसाद गणेशकुमार शुक्‍ला (वय ४५), जयश्री ऊर्फ ज्योती शुक्‍ला (वय ४०), चेतन ऊर्फ अंकित रामसेवक गौतम अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्याने एक अल्पशिक्षित मुलगी नोकरीच्या शोधात होती. तिचा येथील शुक्‍ला परिवारासोबत संपर्क आला. त्यांनी गुजरात राज्यातील सुरत येथे आमचा व्यवसाय असल्याची बतावणी करून चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.

 

रेल्वेगाडीने सुरत येथे गेले

दुसऱ्या दिवशी तिला येथील बसस्थानकावर बोलाविले. मुलीला येथील विठ्ठल वॉर्डातील चेतन ऊर्फ अंकित गौतम याच्या घरी ठेवले. त्या रात्री अंकितने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आणि दुसऱ्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे जयश्री ऊर्फ ज्योती हिच्या भावाकडे सोडले. येथून ज्योती ऊर्फ जयश्री हिने तिला आपल्या सोबत ट्रेनने गुजरात राज्यातील सुरत येथे नेले.

जाणून घ्या : तो रडकुंडीस येऊन म्हणतो, दादाऽऽ दादाऽऽ रिक्षात बसा ना; हृदय हेलावून टाकणारा संघर्ष

अखेर तावडीतून सुटली..पण

काही दिवस घरकाम करायला लावले. मात्र, त्यानंतर तिला मारहाण करून अवैध व्यवसाय करण्यास भाग पाडले. शुक्‍ला परिवाराच्या तावडीतून सुटण्याकरिता तिने हिंमत करून पलायन केले. यानंतर तिची भेट कलाईचे काम करीत असलेल्या आशीष यादव यांच्यासोबत झाली. त्यानंतर तिने त्याच्या सोबत घरोबा केला.

अनेक प्रकरणावर पडणार प्रकाश

यापूर्वी सन २०१३ मध्ये सावळापूर व स्थानिक साईनगरमधील दोन मुलींचे अपहरण केल्याचा गुन्हा शुक्‍ला परिवारावर दाखल आहे. संजयनगर व जनतानगरमधील मुलींना सुरत येथे नेऊन त्यांना अवैध व्यवसायाला लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कविता फुसे व रवींद्र खेडेकर तपासणी करीत आहेत. अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : अरे हे चाललंय काय? कोरोनाच्या भीतीचा डॉक्‍टरांकडून धंदा! एकच चाचणी, तीन डॉक्‍टर, वेगवेगळे दर

अशी मिळाली तपासाला दिशा

मुलीने पलायन केल्यानंतर तिच्या आईने मार्च २०१९ मध्ये याची तक्रार केली होती. परिणामी पोलिस तिच्या शोधात असताना तब्बल १८ महिन्यानंतर मुलगी सुरत येथे असल्याची गुप्त मिळाली. ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खेडेकर, किशोर ताकसांडे व नंदागवळी यांनी सुरत गाठले. शनिवारी (ता. ५) मुलीसह आशीष यादव याला ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या तपासात शुक्‍ला परिवाराचे कृत्य उघड झाले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lure of a job led a poor girl into an illegal business