श्रीलंका ते मेरूपर्वताच्या मध्यबिंदूवरील ‘मध्यमेश्‍वर’; भाष्कराचार्यांच्या ग्रंथात याचा उल्लेख

राजदत्त पाठक
Friday, 22 May 2020

भाष्कराचार्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ ग्रंथात याचा उल्लेख आहे. प्राचिनकाळी याठिकाणी वाकाटक़ांची वेधशाळा होती. इस्लामी शासक व निजामांच्या काळात हे मंदिर भग्न झाले होते.
 

वाशीम : वाशीम क्षेत्री भगवान भोलेनाथांची विविध पवित्रस्थाने आहेत. यात अतिप्राचीन मध्यमेश्‍वर महादेवाला विशेष स्थान आहे. येथे श्रावणमासात शहरातील भाविकांची गर्दी होते. लंके पासून मेरू पर्वतापर्यंत कल्पलेल्या भूमध्यरेषेच्या मध्यबिंदूवर मध्यमेश्‍वर संस्थान आहे.

भाष्कराचार्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ ग्रंथात याचा उल्लेख आहे. प्राचिनकाळी याठिकाणी वाकाटक़ांची वेधशाळा होती. इस्लामी शासक व निजामांच्या काळात हे मंदिर भग्न झाले होते. मध्यमेश्‍वराच्या परिसराची अनेक पुरातत्त्व अभ्यासकांनी पाहणी केली आहे. या ठिकाणी उत्खनन करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मध्यमेश्‍वराचा शोध आणि पुननिर्माणासाठी कै. अण्णासाहेब डबीर, कै. गोपाळशास्त्री काशिकर यांनी पुढाकार घेतला. 

आवश्यक वाचा - धक्कादायक! मस्तवाल वाळू माफियाची मुजोरी; तहसीलदारांना शर्ट फाडून मारहाण

त्यांच्या कार्यात अनेक मान्यवर सहभागी झाले. पुरातन मंदिराच्या जागेचा शोध घेऊन 1958 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन झाले. भाविकांच्या सहकार्याने अल्पावधीतच मंदिर बांधल्या गेले. ज्येष्ठ शु. 3 शके 1883 म्हणजे इ. स. 1961 ला करवीर पिठाचे अधिपती जगत्गुरू शंकराचार्य संदेश्‍वर स्वामी यांच्या हस्ते मध्यमेश्‍वराची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी इतिहास संशोधक म. म. मिराशी, अण्णासाहेब डबीर, गोपाळशास्त्री काशिकर, नारायणराव काळे, शांडिल्यगुरू, ना. रा. धनागरे, तात्या देव, शंकरगुरू कोराण्णे, बाबासाहेब धनागरे यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा - अरे वा! एसटी बस धावणार, हेअर सलून उघडणार; असा ठरला 'टाईमटेबल'

शिवरात्री व इतर धार्मिक उत्सव येथे साजरे होतात. हे धार्मिक श्रद्धास्थान इतिहास आणि धर्मासाठी स्वाभिमानाचे प्रतीक आहे. सध्याच्या विश्वस्त मंडळात प्र. गो. जहागीरदार,दिनकर बक्षी, दादासाहेब घिसड, श्रीपादराव माझोडकर, आहेत. लक्ष्मणराव (बंडोपंत) जहागीरदार, दिनकरराव पांडे यांनी या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू केले आहेत.

सखोल अभ्यास होण्याची गरज
वत्सगुल्म (वाशीम) ही नगरी पूर्वी वाकाटकांची राजधानी होती. त्यामुळे या शहरात अनेक पुरातन वास्तू, धार्मिक स्थळे आहेत. यातील अनेक काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. मध्यमेश्‍वर संस्थानच्या परिसरात वाकाटकांची वेधशाळा होती. त्याबाबतचे अनेक पुरातन अवशेष अजूनही आढळून येतात. इतिहासात दडलेले हे रहस्य अभ्यासकांसाठी पुन्हा उजेडात आणण्यासाठी या परिसराचा अभ्यास होणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhmeshwar is midpoint of washim from Sri Lanka to meru mountain