
जमिनीपासून किमान 10 ते 12 फूट खाली शिरून या मंदिरातील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेता येते. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोताळा (जि.बुलडाणा) : शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले राजूर येथील रामेश्वर शिवमंदिर, कोथळी येथील हेमाडपंथी महादेव मंदिर, श्री क्षेत्र कमळनाथ मंदिर, बोरखेडचे महादेव मंदिर, रोहिणखेड येथील खोलेश्वर मंदिर, नागझरीचे प्राचीन शिवमंदिर, मोताळा शहरातील सर्वेश्वर मंदिर यासह तालुकाभरातील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी (ता.21) शिवभक्तांची गर्दी उसळणार आहे. तर, राजूर येथे दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील राजूर येथे शिवकालीन हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे. अजिंठा पर्वत रांगांमधून निघालेल्या दोन नद्यांच्या संगमावर हे पुरातन मंदिर वसलेले आहे. जमिनीपासून किमान 10 ते 12 फूट खाली शिरून या मंदिरातील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेता येते. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील कोथळी येथे महादेवाची दोन हेमाडपंथी प्राचीन चिंतामणी शिवमंदिरे आहेत. दोन्ही मंदिरातील गर्भगृहात असलेल्या महादेवाच्या पिंडीला सूर्याची किरणे अभिषेक करतात.
महत्त्वाची बातमी - बच्चू कडूंचा ताफा अडविला; मग घडले असे...
विश्वगंगा नदीच्या काठावर मांदियाळी
या हेमाडपंथी मंदिराचे निर्माणकार्य 13 व्या शतकात झाल्याचा पुरातन विभागाचा अंदाज आहे. देवगिरीचा राजा राममोहनराय यांच्या कारकिर्दीत वास्तुशिल्पकार हेमांद्री पंडित यांनी हे मंदिर उभारल्याचे सांगितल्या जाते. विश्वगंगा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी असते. कोथळी गावापासून 10 कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कमळनाथचे मंदिर आहे. श्री क्षेत्र कमळनाथ जागृत देवस्थळ असल्याचे मानल्या जाते. प्राचीन काळात कमळनाथ नावाचे सिद्ध पुरुष संत या ठिकाणी आले होते. त्यावेळी या मंदिराचे निर्माण करण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिरालगतच्या नदीला कमळजा असे नाव दिल्या गेले. दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर या ठिकाणी यात्रेचे आयोजन केल्या जाते.
एक हजार आठ शिवलिंगाची स्थापना
तालुक्यातील बोरखेड येथील नयनरम्य परिसरात श्री. मधुशंकर महाराज यांचा मठ आहे. या ठिकाणी प्रसिद्ध शिवमंदिर असून, या मंदिरात एक हजार आठ शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. रोहिणखेड गावालगत प्राचीन कोळेश्वर शिवमंदिर व भव्य सभामंडप आहे. मंदिरात महादेवाची मोठी पिंड असून, मंदिराच्या प्रांगणात नंदीची मोठी मूर्ती आहे. मोताळा शहरातील सर्वेश्वर नगरमधील सर्वेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान दररोज सकाळी काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, संगीत रामायण, हरिपाठ व रात्रीला हरिकीर्तन, जागरण असे विविध धार्मिक कार्यक्रमाची सात दिवस रेलचेल असते, यासह तालुकाभरातील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविक-भक्त भोलेनाथाचा गजर करतात.
शिवदर्शनासोबतच पर्यटनाचा आनंद
तालुक्यातील बहुतांश शिवमंदिर प्राचीन असून, निसर्गाच्या कुशीत वसलेले आहेत. येथील नैसर्गिक सौंदर्य भाविक-भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर या ठिकाणी शिवभक्तांची अलोट गर्दी उसळते. भाविकांना या ऐतिहासिक मंदिरात शिवदर्शन झाल्यावर परिसरात पर्यटनाचा आनंद लुटता येते.