Vidhan Sabha 2019 : ‘अमूल’सारखा प्रकल्प आणणार - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

कलम ३७० रद्द करून काश्‍मीर भारतासोबत जोडले, उरी व पुलवामामधील घटनांचा बदला घेतला. काँग्रेसच्या काळात शत्रूला प्रत्युत्तर दिले जात नव्हते, ते काम मोदी सरकारने केले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेळघाटातील धारणी येथे केला. यासोबतच मेळघाटात ‘अमूल’सारखा दुग्धव्यवसायाचा प्रकल्प निर्माण करण्याचे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले.

विधानसभा 2019 : अमरावती - कलम ३७० रद्द करून काश्‍मीर भारतासोबत जोडले, उरी व पुलवामामधील घटनांचा बदला घेतला. काँग्रेसच्या काळात शत्रूला प्रत्युत्तर दिले जात नव्हते, ते काम मोदी सरकारने केले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेळघाटातील धारणी येथे केला. यासोबतच मेळघाटात ‘अमूल’सारखा दुग्धव्यवसायाचा प्रकल्प निर्माण करण्याचे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले.

भाजप-शिवसेना युतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत अमित शहा बोलत होते. या वेळी शहा यांचे गावपगडी व तुरा बांधून स्वागत करण्यात आले.

मेळघाटातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी अमूल इंडियासारखी मोठी कंपनी येथे स्थापन करण्यात येईल. त्याचबरोबर अमरावती येथे विमानतळ निर्माण करण्यात येणार आहे, असे शहा म्हणाले. त्यानंतर शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व काँग्रेसवर चौफेर हल्ले चढविले. 

शहा म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केवळ भ्रष्टाचार केला आहे. याउलट भाजप सरकारने पारदर्शी कारभार केला. आमच्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, हे आमचे काम आहे. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार मौनी सरकार होते. शत्रूराष्ट्राकडून हल्ले होत होते, तेव्हा हे सरकार केवळ निंदा करीत होते. याउलट आमच्या सरकारने उरी व पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 amit shah speech politics