Vidhan Sabha 2019 : वर्धा जिल्हा : युतीसमोर बंडखोरीचेच आव्हान

प्रवीण धोपटे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

तीन पक्षांची साथ?
देवळी मतदारसंघाकरिता शिवसेनेची उमेदवारी समीर देशमुख यांना मिळाली. युतीचे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच भाजपचे जिल्हाध्यक्ष बकाणेंनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. समीर देशमुख यांचे वडील प्रा. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे जिल्हा नेते आहेत. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि भाजपची व्होटबॅंकही आपल्याला मिळेल, असा देशमुख यांचा होरा होता. परंतु, बदललेल्या परिस्थितीत भाजपची कितपत साथ मिळते, असा प्रश्‍न आहे.

विधानसभा 2019 : वर्धा, आर्वीत गतवेळच्याच स्पर्धकांमध्ये थेट लढत आहे, तर युतीला बंडखोरीने ग्रासले आहे. भाजप-शिवसेना युतीतील बंडखोरीमुळे देवळी आणि हिंगणघाट मतदारसंघात लढत तिरंगी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढती बहुरंगी आणि लक्षवेधी ठरल्या आहेत.

जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झालेय. भाजप-शिवसेना युतीतील बंडखोरीमुळे देवळी आणि हिंगणघाट मतदारसंघात लढत तिरंगी होण्याची शक्‍यता आहे. मात्र, वर्धा आणि आर्वी मतदारसंघात बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी थेट लढती होतील. युतीमध्ये भाजपला वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी; तर शिवसेनेला देवळी मतदारसंघ मिळालाय. आघाडीमध्ये काँग्रेसला देवळी, आर्वी आणि वर्धा; तर राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगणघाट मतदारसंघ मिळालाय. वर्धा मतदारसंघात आमदार डॉ. पंकज भोयर (भाजप) यांच्यापुढे पुन्हा काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे आव्हान आहे. शेंडे यांचा यापूर्वी दोनदा पराभव झालाय. पहिल्यांदा प्रा. सुरेश देशमुख, तर दुसऱ्यांदा डॉ. भोयर यांनी त्यांचा पराभव केलाय. दोनही निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. या वेळी पक्षाने तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्‍वास टाकलाय. मतदारसंघातील उद्योगांची कमतरता, बेरोजगारी, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन त्यांना निवडणूक लढावी लागणार आहे. आमदार डॉ. भोयर हे मागील पाच वर्षांत केलेल्या कामांना ‘फोकस’ करीत आहेत.

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासह रोजगारनिर्मितीत कार्य करण्याकरिता दुसऱ्यांदा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
देवळी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. येथून शिवसेनेचे समीर देशमुख उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या स्वप्नांना सुरुंग लागलाय. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजपमधून बंडखोरीमुळे येथे युती धर्माचे कितपत पालन होईल, असा प्रश्‍न आहे. आमदार रणजित कांबळे (काँग्रेस) हे सलग चार वेळा निवडून आले असून, ही त्यांची पाचवी निवडणूक आहे.

बकाणेंच्या बंडखोरीने त्यांचा मार्ग सोपा झाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, समीर देशमुख यांनी आपला विजय पक्का असल्याचा दावा केलाय. बकाणे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारी लढवत असल्याचे म्हटले आहे. एकूण परिस्थिती पाहता कांबळे यांचा पराभव करणे मोठे आव्हान ठरणार आहे.

हिंगणघाटमध्येही युतीत बंडखोरी आहे. शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादीचे नेते ॲड. सुधीर कोठारी यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल केली. मात्र, नंतर मागे घेतला. त्यामुळे आमदार समीर कुणावार (भाजप) आणि माजी आमदार राजू तिमांडे (राष्ट्रवादी) यांच्यासमोर शिंदे यांचेही आव्हान आहे. येथील लढत तिरंगी होईल, अशी शक्‍यता आहे. मागील निवडणुकीत कुणावार हे विक्रमी ६० हजार मतांनी निवडून आले होते. तो फरक भरून काढण्याचे खरे आव्हान विरोधी उमेदवारांसमोर आहे.

आर्वीमधून आमदार अमर काळे (काँग्रेस) आणि माजी आमदार दादाराव केचे (भाजप) या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा दुरंगी लढत आहे. येथून कोणत्याही पक्षात बंडखोरी झाली नसल्याने दोन्ही तुल्यबळ उमेदवारांमध्ये थेट सामना रंगेल. २००९ च्या लढतीत केचेंनी काळेंना पराभूत केले होते. २०१४ मध्ये मागील निवडणुकीत काळेंनी केचेंना पराभूत केले होते. आता त्या पराभवाचा वचपा काढण्यात केचे यांना यश येते, की पुन्हा एकदा काळे विजयी होतात, याविषयी उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 wardha district yuti rebel politics