महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होईल 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

> फडणवीस, पवार टॉपचे बॅट्‌समन 
> महाराष्ट्राच्या भल्यासाठी अजित पवारांचा योग्य निर्णय 
> अमित शहा व नितीन गडकरी यांनी महत्त्वाच्या घडामोडी घडवून आणल्या 
> महाराष्ट्रात विकासाच नवीन पर्व सुरू झाला 

नागपूर : गेल्या महिन्याभरातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस आणि पवार हे दोघेही टॉपचे बॅट्‌समन आहेत. त्यामुळे आता येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात क्रमांक एकचे राज्य होईल. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेतला असल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय नेते अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी फार महत्त्वाच्या घडामोडी घडवून आणल्या. त्याचा फायदा लवकरच महाराष्ट्राची जनता बघेल. अजित पवार ऊर्जामंत्री असताना मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. तेव्हा मी त्यांच्या कामाचा धडाका पाहिला आहे. ते मोठे नेते आहेतच पण सोबत धडाडीचे कार्यकर्तेदेखील आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्रात विकासाच नवीन पर्व सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले. 

तीन पक्षांचे सरकार चालले नसते 
तसेही तीन पक्षांचे सरकार जास्त काळ चालले नसते. त्यामुळे राज्याचे नुकसानच होणार होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत. ते अमलात येण्यासाठी पुन्हा त्यांचेच सरकार येणे गरजेचे होते, ते आले आहे. 
- चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे माजी ऊर्जामंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra will be the number one state