सोयाबीन आणि कापसासाठीही मोठे आंदोलन उभारू!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

माजी खासदार राजू शेट्टी ः शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी लढावू संघटना उभारणार

अकोला : ऊसाच्या प्रश्‍नावर राज्यात मोठ-मोठी आंदोलने उभारणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेने राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर येत्या काळात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही मोठे आंदोलन उभारण्याची तयारी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीही जागृत असायला हवे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी ‘स्वाभीमानी’ची लढावू संघटना उभारणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

संघटनेची पुनर्बांधनी करण्याच्या उद्देशाने विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राजू शेट्टी बुधवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परके हे त्यांच्यासोबत होते. केंद्र सरकारच्या चुकलेल्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्याची नैतिक जबाबदारीही सरकारचीच असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सरकारचे चुकत असेल तर त्याचे समर्थन करणार नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून मूळ प्रश्‍नांवरून लक्ष विलचित करण्याचा प्रयत्न
जाती आणि धर्माच्या नावाखाली भावनिक मुद्द्यांना हात घालून मूळ प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. अशांतता निर्माण करणारा भाजप पक्ष आहे. एनआरसी आणि सीएए हाही त्यापैकीच एक मुद्दा असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

कर्जमाफी फसवीच
भाजपच्या काळात देण्यात आलेल्या कर्जमाफीपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. आताच्या सरकारनेही दिलेले आश्‍वासन पाळले नाही. 7/12 कोरा करण्याचे आश्‍वासन दिले, पण झाला नाही. त्यातच आता दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. ती दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. ही कर्जमाफीही फसवीच आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. या कर्जमाफीच्या निकषांचा विचार केला तर 85 टक्के शेतकरी आताच या योजनेतून बाद झाले आहेत, असे ते म्हणाले. थकीत कर्जबाबात धोरण निश्‍चित करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भावांतर योजना लागू करा
दर दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाही. खरीप पीक गेले आता रब्बीतही दिलासा नाही. हमी भावाप्रमाणे शेती माल खरेदी होत नाही. व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी केली जाते. त्यामुळे हमी भाव व बाजार मूल्य यामध्ये असलेल्या फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवी. भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

मंदीची तोड शेतीतूनच
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. हा अर्थसंकल्प म्हणणे आश्‍वासनांचा बुडबुडा होता. देशात मंदीचे सावट आहे. लोकांची क्रय शक्तीच राहिली नाही तर त्याचा परिणाम उद्योग, व्यवसायावर होतो. शेती हे एकमेव क्षेत्र आहे, ज्यातून मंदीवर तोड निघू शकते. त्यामुळे जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा वाढविण्याची गरज असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a big movement for beans and cotton