
यासंदर्भात संघटनेने पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २७ वर्षांपासून दारूबंदी लागू आहे. गेली चार वर्षे दारू-तंबाखू मुक्तीसाठी मुक्तिपथ अभियान व शासकीय सहकार्य यामुळे ती अधिकच प्रभावी झाली आहे.
गडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे सामूहिक सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल तसेच पंतप्रधान, राष्ट्रपती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठविल्याची माहिती जिल्हा दारूमुक्ती संघटनेने दिली आहे.
यासंदर्भात संघटनेने पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २७ वर्षांपासून दारूबंदी लागू आहे. गेली चार वर्षे दारू-तंबाखू मुक्तीसाठी मुक्तिपथ अभियान व शासकीय सहकार्य यामुळे ती अधिकच प्रभावी झाली आहे.
७०० गावांतील लोकांनी गावातील दारू व ३०० गावांनी तंबाखूविक्री बंद केली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण दारूविक्रीचे प्रमाण उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत केवळ अकरा टक्के शिल्लक आहे. असे असूनही "दारूबंदी अयशस्वी आहे, ती उठवा, दारू खुलेपणे विक्री करा' अशी मागणी महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार व गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे.
शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवावी, यासाठीही वडेट्टीवारांनी विडा उचलला आहे. जिल्हा दारूमुक्ती संघटना, मुक्तिपथ अभियान व ‘सर्च’ संस्था यांच्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ८३८ गावांनी सामूहिक सह्यांची निवेदने रविवारी (ता. ६) महाराष्ट्र शासनाला पाठवल्याची माहिती संघटनेने दिली आहे. जिल्हा दारूमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग, उपाध्यक्ष देवाजी तोफा, सल्लागार हिरामण वरखेडे, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. राणी बंग आहेत. जनतेच्या सामूहिक इच्छेला योग्य प्रतिसाद देण्याचे आवाहन संघटनेने महाराष्ट्र शासनाला केले आहे.
निवेदन देणाऱ्या गावांची तालुकानिहाय संख्या
1) देसाईगंज -28
2) आरमोरी - 44
3) कुरखेडा - 79
4) कोरची - 65
5) धानोरा - 91
6) गडचिरोली - 80
7) चामोर्शी - 83
8) मुलचेरा - 57
9) एटापल्ली - 95
10) भामरागड - 74
11) अहेरी - 48
12) सिरोंचा - 94
संपादन - अथर्व महांकाळ