गोंदिया जिल्ह्यातील मालीजुंगा-धानोरी रस्ता देतोय मृत्युला आमंत्रण; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 

Malijunga to Dhanori road is in bad condition in Gondia
Malijunga to Dhanori road is in bad condition in Gondia

पांढरी (जि. गोंदिया) ः सडक अर्जुनी तालुक्‍यातील मालीजुंगा ते धानोरी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेने तीन किलोमीटर रस्ता आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून तसाच ठेवला. परिणामी, हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. असे असले तरी, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.   

कित्येक वर्षांपूर्वी मुरदोली ते कोसमतोंडी या मुख्य मार्गापासून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या धानोरी, लेंडेझरी व मुरपार या गावांना जाण्याकरिता डांबरीकरण रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, रस्ता निर्मितीपासून तर आजपर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पूर्णत: पाठ फिरविल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी झालीच नाही. परिणामी, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. 

मुख्य रस्त्यापासून सितेपार ते मालीजुंगापर्यंतचा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत गुळगुळीत झाला आहे. उर्वरित मालीजुंगा ते धानोरी हा तीन किलोमीटरचा रस्ता अजूनही खड्ड्यात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मालीजुंगा ते धानोरी रस्ता वलयकार व जंगलव्याप्त भागात असल्याने या मार्गावर लहान-मोठ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण क्षेत्रात शासनाचे दोन-तीन विभाग रस्ता बांधकाम निर्मितीचे कामे करीत असून, अभियंत्यांचे ऐकमेकांकडे बोट दाखविण्याचे सत्र सुरू  आहे. पण मालीजुंगा ते धानोरीपर्यंतचा रस्ता कोणत्या विभागाकडे हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची चौकशी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.  

अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत येत असलेल्या पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रांतील बहुतेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. घटेगाव ते मुंडीपार/ ई., चिचटोला ते धानोरी, चिचटोला ते बसस्थानक, किसनपूर ते शिकारीटोला अशा अनेक रस्त्याच्या दुरुस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र
दिसून येत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com