मामाच झाला वैरी अन्‌ घडले असे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

मामा आणि भाच्याचे नाते हे प्रेम आणि आपुलकीचे समजले जाते. मात्र, याच नात्याला मामाने काळिमा फासला. अवजड काठीने वार करून मामाने भाच्याचा खून केल्याची हृदयद्रावक घटना वरवट येथे सोमवारी (ता. 27) उघडकीस आली. दीक्षान्त कावडे (वय 4), असे मृत भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रंगनाथ गेडाम (वय 40) याला अटक केली आहे.

चंद्रपूर : जिल्हा मुख्यालयापासून आणि दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत वरवट हे गाव येते. याच गावात कावडे कुटुंबीय राहतात. सोमवारी (ता. 27) सकाळी अकराच्या सुमारास कावडे यांचा चिमुकला चार वर्षीय मुलगा दीक्षान्त अंगणात खेळत होता. तेवढ्यात त्याचा मामा रंगनाथ गेडाम तिथे आला.

काही कळण्याच्या आताच त्याने दीक्षान्तच्या डोक्‍यावर लाकडी फळीने वार करणे सुरू केले. दीक्षान्तच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीली घेतले ताब्यात

या घटनेची माहिती गावात पसरली आहे. गावकऱ्यांनी रंगनाथला गावातच एका जागी पकडून बांधले. त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर या घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक वरवट या गावी दाखल झाले.

त्यांनी रंगनाथला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या खुनाचे नेमके कारण काय होते, याचा अजूनही उलगडा झालेला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अवश्‍य वाचा : बहीण जावयाचे आपल्या बायकोशी संबंध असल्याचा संशय अन्‌ स्वत:चे...

मनोरुग्ण असल्याची चर्चा

दीक्षान्तला संपविणारा त्याचा मामा रंगनाथ हा मनोरुग्ण असल्याची माहिती आहे. याच अवस्थेतून त्याने आपल्या भाच्यावर लाकडी फळीने वार करून संपविले असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्या पोलिस खुनाचे कारण शोधत आहेत. घटनेचा अधिक तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mama murdered a nephew by at chandrapur