मंडई बेतली जीवावर, नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत हार्दीक हातझाडे

मंडई बेतली जीवावर, नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

निलज बु. (जि. भंडारा) : नदीवर पोहायला गेलेल्या तीन मित्रांना पाण्याचा अंदाज आला नाही. यात ते गटांगळ्या खाऊ लागले. मात्र, यातील दोघांचे वाचविण्यात यश आले अन्य एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथील वैनगंगा नदीवर (Vainganga River) घडली असून तब्बल सहा तासानंतर हार्दीकचा मृतदेह सापडला.

हेही वाचा: नातेवाईक स्वीकारणार मिलिंद तेलतुंबडेचा मृतदेह, वणीमध्ये आज अंत्यसंस्कार

हार्दिक भोजराम हातझाडे (१७) (रा. कोका) असे मृताचे, तर गणेश सहस्त्रराम बाम्हणे (१७) आणि विक्की दिनेश साठवणे (१७) असे बचावलेल्या दोघांची नावे आहेत. मोहाडी तालुक्यातील करडी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ व्या वर्गात शिकणारे हे तिघेही वर्गमित्र आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र मंडईची धूम सुरू आहे. शनिवारला गावालगत असलेल्या खडकी येथे मंडईचा कार्यक्रम होता. मंडई बघायला हे तिघेही मित्र एकत्र आले होते. तिघांनीही मंडईत मनोरंजन केल्यानंतर रविवारी सकाळी हार्दिक हातझाडे, गणेश बाम्हणे, विक्की साठवणे हे तिघेही पोहण्यासाठी जवळच असलेल्या कान्हळगाव येथील वैनगंगा नदीवर गेले.

सध्या गोसेखुर्द धरणात जलसंचय करणे सुरू आहे. त्यामुळे गोसे धरणाच्या बॅकवॉटरमुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. याची कल्पना नसलेल्या या युवकांनी नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उड्या घेतल्या. मात्र, नदीपात्रात पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने तिघेही बुडू लागले. कान्हळगाव येथील सहादेव शेंडे यांनी दोघांना वाचविले. पण, एकाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती करडीचे ठाणेदार निलेश वाझे यांना मिळताच ते आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव स्थानिक मच्छिमार बांधवांच्या मदतीने हार्दिकचा शोध घेतला. सुमारास हार्दिकचा मृतदेह घटनास्थळावरून सुमारे ३०० मीटर अंतरावर शोधून काढण्यात कान्हळगाव येथील ढिवर बांधवांना यश आले. घटनेचा अधिक तपास ठाणेदार निलेश वाझे करीत आहे.

शोधकार्यात १२ वर्षीय बालकाचा समावेश -

नदीपात्रात हार्दिक बुडाल्याची माहिती मिळताच कान्हळगाव येथील मच्छिमार बांधवांनी कुठल्याही शासकीय मदतीची वाट न बघता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याचा शोध घेतला. तब्बल सहा तास नदीच्या पाण्यात हार्दिकचा शोध घेत त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या शोधकार्यात क्रिश शेंडे या १२ वर्षीय बालकाचा समावेश होता. विशेष म्हणजे, क्रिश हा पट्टीचा पोहणारा आहे. शोधकार्यात सहभाग घेणान्यांमध्ये संजय केवट (२६), मनीष कांबळे (१९), अक्षय केवट (२५) सर्व रा. कान्हळगाव तर, रोहन मेंढरे (३१) रा. मुंढरी या पाच जणांचा समावेश आहे.

सहादेव दोघांसाठी देवदूत ठरला -

नदीपात्रात उड्या घेतल्यानंतर तरुण गटांगळ्या खात होते. एक क्षण ते गम्मत करीत असल्याचा भास झाला. मात्र, क्षणात लक्षात आले की, तिघेही तरुण नदीच्या पाण्यात बुडत आहेत; त्यामुळे तिथे जवळच म्हशींना अंघोळ घालत असलेल्या सहादेव शेंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत गणेश आणि विकीला तातडीने पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचविला. याचवेळी हार्दिक सहादेव शेंडे वैनगंगा नदी पात्रात दिसेनासा झाला आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सहादेव यांनी गणेश आणि विक्कीला पाण्याबाहेर काढल्याने ते दोघांसाठी देवदूत ठरले.

गोसेच्या बॅक वॉटरमुळे पाण्यात वाढ -

गोसेखुर्द धरणात जलसंचय सुरू आहे. धरणाच्या बॅक वॉटरमुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. नागरिक तथा पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सतर्कता बाळगल्यास घटना टळू शकतात.
-दिगंबर कुकडे, सरपंच, ग्रामपंचायत कान्हळगाव
loading image
go to top