Video : अरेच्चा..! बोअरिंग केले एकाच्या घरी अन्‌ पाणी लागले दुसऱ्याच्या घरी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

धामणगाव रेल्वे शहरातील तुळजाईनगरमध्ये अरुण चव्हाण यांचे घर आहे. उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई जाणवत असल्याने व पाण्यासाठी रोजची पायपीट करावी लागत असल्याने चव्हाण यांनी आपल्याच घरी घरी बोअरिंग खोदण्याचा विचार केला.

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती)  : शहरातील एका व्यक्तीने आपल्या घराच्या आवारात पाण्यासाठी बोअरिंगचे काम सुरू केले. बोअरिंग करणे सुरू असतानाच एक आश्‍चर्यकारक घटना घडली. ज्या व्यक्तीकडे बोअरिंगचे काम सुरू होते, त्याच्या शेजारच्या घरातील बोअरमधून त्याच वेळेला 10 फूट उंच पाण्याचे कारंजे उडायला लागले. लोकांनी पूर्वी कधीही न बघितलेला हा अनोखा प्रकार जवळपास अर्धा तास सुरू होता. 

धामणगाव रेल्वे शहरातील तुळजाईनगरमध्ये अरुण चव्हाण यांचे घर आहे. उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई जाणवत असल्याने व पाण्यासाठी रोजची पायपीट करावी लागत असल्याने चव्हाण यांनी आपल्याच घरी घरी बोअरिंग खोदण्याचा विचार केला. बोअरिंग करणाऱ्या कंपनीशी बोलून त्यांनी त्यासाठी एक दिवस ठरविला. ठरलेल्या दिवशी चव्हाण यांच्या घराच्या आवारात बोअरिंगचे काम सुरू झाले.

सुमारे 26 फूट खोल बोअरिंग झाले. बोअरिंग करणे सुरू असतानाच एक चमत्कारिक घटना घडली. चव्हाण यांच्या घरापासून सुमारे 30 फूट अंतरावर असलेल्या मोरेश्वर मेश्राम यांच्या घरच्या बोअरमधून एकाएकी पाण्याचे कारंजे उडायला लागले. त्यांनी लगेच बोअरवरील मोटार काढून ठेवली. त्यानंतर त्या बोअरमधून खूप जोराने पाण्याचे कारंजे उडायला लागले. हे कारंजे दहा फूट उंच उडत होते. 

अवश्य पहा- Video : वर्ध्यात घडली चिड आणणारी घटना; सैतान युवकाचे चिमुकल्याशी अनैसर्गिक कृत्य अन् ...

आश्‍चर्य व्यक्त करणारी ही माहिती मिळताच परिसरातील लोकांनी हे दृश्‍य बघण्यासाठी त्याठिकाणी एकच गर्दी केली. कधीही न बघितलेला हा काय प्रकार आहे, याची कुजबुज ते करायला लागले. सुमारे अर्धा तास भूगर्भातील एक अनोखा अनुभव लोकांना बघायला मिळाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A man dig Tubewell in his house and at same time his Neighbor tubewell flooded