esakal | उपचाराअभावी झाडाखालीच 'त्यांना' सोडला जीव; बेड मिळेना; चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील प्रकार

बोलून बातमी शोधा

death
उपचाराअभावी झाडाखालीच 'त्यांना' सोडला जीव; बेड मिळेना; चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील प्रकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : गावखेड्यातून उपचारासाठी आलेल्या एका कोरोना रुग्णाला बेड मिळाला नाही. वेळेवर उपचार झाला नाही. त्यामुळे आसरा घेत असलेल्या झाडाखालीच त्याने जीव सोडला. ही घटना गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालय परिसरात घडली. बापू कापकर (रा. चंदनखेडा, भद्रावती) असे मृत रुग्णाचे नाव आहे. विशेष म्हणजे, तब्बल १७ रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत रुग्णालय परिसरात होते.

हेही वाचा: धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्ताचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

भद्रावती तालुक्‍यातील चंदनखेडा येथील बापू कापकर यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यामुळे कुटुंबीयांनी उपचार व्हावा म्हणून चंद्रपूर येथे आणले. शहरातील सर्व रुग्णालये फिरले. मात्र, त्यांना कुठेही बेड उपलब्ध झाला नाही. अखेर, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालयात आले. तेथेही आधीपासूनच रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना एका झाडाखाली आसरा म्हणून ठेवले. प्रकृती बिघडत गेली. वेळेवर उपचार झाला नाही. त्यामुळे काही वेळानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. मागील पंधरवड्यापासून दररोज नवीन हजारो रुग्ण आढळत आहेत. तर, मृत्यूचा आकडाही २५ हूनअधिक आहे. शहरासह आता ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तर कोविड केअर सेंटर सुरू केले. मात्र, या रुग्णालयांत ऑक्‍सिजन बेड नसल्याने गंभीर रुग्णांना जिल्हास्थानी धाव घ्यावी लागत आहे.

हेही वाचा: 'आम्ही ऑक्‍सिजन देणार नाही, तुमची सोय तुम्हीच करा'; जिल्हा प्रशासनाची खासगी रुग्णालयांना अट

त्यामुळे शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालये रुग्णांनी भरले आहेत. एकाही रुग्णालयात बेड उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची उपचारासाठी मोठी धावपळ सुरू आहे. अनेक रुग्ण बाहेर जिल्ह्यातही उपचारासाठी जात असल्याचे चित्र आहे.

संपादन - अथर्व महांकाळ