esakal | पोटचा गोळाच उठला जीवावर, १८ तास पडून होता मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पोटचा गोळाच उठला जीवावर, १८ तास पडून होता मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : धारणीपासून ४० किलोमीटर अंतरावरील सुसर्दा गावात मुलाने बेदम मारहाण करून पित्याचा खून (amravati crime) केला. खून केल्यानंतर मृतदेह जवळपास १८ तास घरातच पडून होता. धारणी पोलिसांनी (Dharani police) मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

सोनाजी कान्हा सेलुकर (वय ६०, रा. सुसर्दा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. सोमवारी (ता. ३०) दुपारी हत्या केल्यानंतर मृतदेह जवळपास अठरा ते वीस तास घरातच पडून होता. मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी याप्रकरणी धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुसर्दा येथील पोलिस पाटील सुनील भिलावेकर यांनी पोलिसांत तक्रार केली. मौजीलाल सोनाजी सेलुकर (वय २५, रा. सुसर्दा) असे खुनाचा गुन्ह्यात अटक झालेल्या संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. सोनाजीला जंगलातच दारू काढून पिण्याची सवय होती. मुलाला सुद्धा तशीच सवय होती. त्यातून त्या दोघांमध्ये वाद झाला असावा. त्या वादातून घरासमोरच मुलगा मौजीलाल याने वृद्ध वडील सोनाजी यांना लाथाबुक्क्यांनी आधी जबर मारहाण केली. शिवाय काठीनेही प्रहार केला. यामध्ये सोनाजी गंभीर जखमी झाले. मुलाने त्याच स्थितीत झोपडीत आणून टाकले आणि स्वतः फरार झाला. जवळपास २० तासानंतर पोलिस पाटलांनी घटनेची माहिती धारणी पोलिसांना दिली. धारणीपासून घटनास्थळाचे अंतर ४० किलोमीटर आहे. पोलिसांनी तातडीने सायंकाळी पित्याच्या हत्येप्रकरणी मुलगा मौजीलाल यास अटक केली. त्याला बुधवारी (ता. १) न्यायालयासमोर हजर केले.

नशेत असताना वडील व मुलांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण होऊन त्यातून मुलाने वडिलांचा खून केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांची चौकशी सुरू आहे.
-सुरेंद्र बेलखेडे, ठाणेदार, धारणी पोलिस ठाणे.
loading image
go to top