अखेर ती नरभक्षक झाली कैद; दोघांचा घेतला होता बळी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

घटनास्थळावरील लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघिणीचे फोटो मिळाले. समितीने या वाघिणीबाबत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया तसेच इतर वाघांच्या छायाचित्रांचा अभ्यास केला. यातून तो ब्रह्मपुरी वनविभागातून आल्याचे निष्पन्न झाले.

गोंदिया  : गोंदिया वनविभागांतर्गत गोरेगाव, तिरोडा वनपरिक्षेत्रात मार्च व एप्रिल महिन्यात एक महिला व एका पुरुषावर हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या वाघिणीला अखेर गुरुवारी (ता.7) पिंजऱ्यात कैद करण्यात आले. ही कारवाई गोंदिया वनविभाग व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग गोंदियाच्या चमूने नवरगाव तलाव परिसरात केली. 

गोंदिया वनविभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव, तिरोडा वनपरिक्षेत्रात मार्च व एप्रिल महिन्यात वाघिणीच्या हल्ल्यात एक महिला व एक पुरुष असे दोघेजण ठार झाले होते. दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संस्था नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तांत्रिक समिती गठित करण्यात आली होती. या समितीला वाघाच्या हालचालीचे निरीक्षण करणे, स्थानिक गावकऱ्यांत जनजागृती करणे व अन्य संरक्षणाची कामे सोपविण्यात आली होती. तथापि, घटनास्थळावरील लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघिणीचे फोटो मिळाले. समितीने या वाघिणीबाबत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया तसेच इतर वाघांच्या छायाचित्रांचा अभ्यास केला. यातून तो ब्रह्मपुरी वनविभागातून आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संस्था नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, तांत्रिक समितीचा सल्ला घेऊन मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले. 

अवश्य वाचा-  कर्तव्याला सलाम! अमरावतीत कोविड वॉर्डातील परिचारिकेचे पुष्पवृष्टीने स्वागत 

जेरबंद करण्याकरिता पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी, सुसज्ज रेस्क्‍यू चमू, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियाचे पशुवैद्यकीय अधिकारी व रेस्क्‍यू टीम तसेच गोंदिया वनविभागाची रेस्क्‍यू टीम यांच्या सहकार्याने संयुक्तरित्या वाघिणीला जेरबंद करण्याची कारवाई या क्षेत्रात सुरू करण्यात आली. वाघिणीच्या हालचालींची नोंद घेण्याकरिता एकूण 16 चमू गठित करण्यात आल्या. गोंदिया वनविभाग व नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग गोंदियाच्या कर्मचाऱ्यांची ही संयुक्त मचू होती. या चमूने गुरुवारी (ता. 7) नवरगाव तलाव (गुमाडोह तलाव) या परिसरात वाघिणीला जेरबंद केले. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर खोडस्कर, एकोडीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक गजरे यांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार, कार्यवाही करून वाघीण एन -1 ला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. 

यांनी केली मोहीम फत्ते... 

ही मोहीम नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा वनरक्षक एम. रामानुजम, उपवनसंरक्षक एस. युवराज, साकोली नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियाचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) उत्तम सावंत, सहायक वनरक्षक आर. आर. सदगीर, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया वनविभाग, कोका वन्यजीव विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man killer tiger caught