आयता येथे वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू; सोयाबीनची गंजी लावताना घडली घटना

बबलू जाधव 
Tuesday, 20 October 2020

आयता (हेटी) येथे शेतात सोयाबीन कापणी व गंजी लावण्याचे काम दहा जणांची टोळी असणाऱ्या मजुरांनी घेतले होते. तीन दिवसांपूर्वी शेतातील सोयाबीन पीक कापून ठेवले होते. कापणी केलेल्या सोयाबीनला एकत्र गोळा करून गंजी लावण्यासाठी मजूर शेतात गेलेले होते.

आर्णी ( जि. यवतमाळ) : शेतातील सोयाबीन काढणी केल्यावर गंजी लावत असताना वीज कोसळल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले. ही घटना तालुक्‍यातील आयता (हेटी) येथे सोमवारी (ता.19) दुपारी पाचच्यादरम्यान घडली. तेजस नागोराव मेश्राम (वय 18, रा. आयता (हेटी)) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’

आयता (हेटी) येथे शेतात सोयाबीन कापणी व गंजी लावण्याचे काम दहा जणांची टोळी असणाऱ्या मजुरांनी घेतले होते. तीन दिवसांपूर्वी शेतातील सोयाबीन पीक कापून ठेवले होते. कापणी केलेल्या सोयाबीनला एकत्र गोळा करून गंजी लावण्यासाठी मजूर शेतात गेलेले होते. शेतात काम करीत असताना सोमवारी दुपारी साडेचारच्यादरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. 

पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अंगावर ताडपत्री घेतली. एका ताडपत्रीत तेजस मेश्राम, कृष्णा मेश्राम, सूर्यकांत पेंदोर, मनोज मेश्राम हे चौघेही शेतात बसून होते. त्याचवेळी वीज कोसळल्याने तेजस मेश्राम याचा मृत्यू झाला. तर, कृष्णा सीताराम पेंदोर (वय 22), सूर्यकांत दत्ता पेंदोर (वय 23), मनोज बापूराव मेश्राम (वय 40, सर्व रा. आयता हेटी) हे जखमी झाले. 

सविस्तर वाचा - चाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास

त्यांना तत्काळ उपचारासाठी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. कृष्णा पेंदोरची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. सोमवारी शवविच्छेदन करून तेजसचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. मृताच्या पश्‍चात आईवडील, लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे आयता (हेटी) येथे हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man is more in yavatmal due to lightning strikes