esakal | सकाळ विशेष: जीव वाचवण्यासाठी 'मास्क' लागतो, हेच खरे! एका चिमुकल्याला कळले, ते आम्हाला उमगेल का? हाच खरा प्रश्न 
sakal

बोलून बातमी शोधा

man shared his experience in Covid Hospital with Sakal red full story

बरेचदा कोविड रुग्णालयात उपचार घेताना काही गैरसोयी आल्यास 'निगेटिव्ह' बातमीचा मोठा बोभाटा होतो, अशावेळी शर्थीचे उपचार करताना पॉझिटिव्ह रुग्णाला बरे करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी यांच्यावर विनाकारण कोरडे ओढले जातात.

सकाळ विशेष: जीव वाचवण्यासाठी 'मास्क' लागतो, हेच खरे! एका चिमुकल्याला कळले, ते आम्हाला उमगेल का? हाच खरा प्रश्न 

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद(जि. यवतमाळ): कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला की, अवसान गळून पडल्याचा रुग्ण व नातेवाईकांना भास होतो. भोंगा वाजवत ॲम्बुलन्स घरी येते. सभोवतीचे सारेजण काळजीने काळवंडतात. प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेट्स लावल्याने संपूर्ण परिसरात भीतीची छाया दाटून येते. उपचारानंतर कोरोना निगेटिव्ह होताच ॲम्बुलन्स पुन्हा दारात येते आणि कोरोनाला हरविणाऱ्या योद्ध्यावर फुलांचा वर्षाव होतो. हे चित्र आता सार्वत्रिक झाले आहे.

बरेचदा कोविड रुग्णालयात उपचार घेताना काही गैरसोयी आल्यास 'निगेटिव्ह' बातमीचा मोठा बोभाटा होतो, अशावेळी शर्थीचे उपचार करताना पॉझिटिव्ह रुग्णाला बरे करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी यांच्यावर विनाकारण कोरडे ओढले जातात. सहाजिकच रात्रंदिवस कोरोनाच्या कराल दाढेतून रुग्णांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारी आरोग्य यंत्रणा हबकल्याशिवाय राहत नाही. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांनी आपल्या उस्फूर्त प्रतिक्रिया 'सकाळ' कडे नोंदवून कोविड उपचार केंद्रातील अनुभव वाचकांसाठी शेअर केला.

हेही वाचा - ठाकरे सरकार पेलणार का हे शिवधनुष्य? वाघांचे स्थानांतरण करायचेय, पण कसे? कोणी उपस्थित केला सवाल वाचा  

हर्षी येथील पोलीस पाटील विजय खंदारे यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते १४ दिवस यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोविड रुग्णालयात दाखल होते. वार्डातील १९ रुग्णांवर नियमित उपचार झाले. त्यांच्यासोबत पुसद येथील काही रुग्ण होते. पीपीई घातलेल्या डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाकडे जाऊन  तब्येतीची चौकशी केली. तपासणी करून आवश्यक ती औषधे दिली. न्युमोनिया झालेला असताना औषधोपचाराने त्यांना आधार मिळाला. काही रुग्णांना श्वसनाचा त्रास असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. अर्थातच प्रत्येक रुग्णांची डॉक्टरांनी काळजी घेतली, अशी प्रतिक्रिया विजय खंदारे यांनी व्यक्त केली. 

कोरोना वार्डात कुणालाही परवानगी नसल्याने नातेवाईक भेटायला येऊ शकत नाही. डॉक्टर, नर्स यांच्याशिवाय कोणीही दिसत नाही. अशावेळी रुग्णाला स्वतः हालचाली कराव्या लागतात,हे खरे आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास डॉक्टरांची प्रयत्नांची शिकस्त अधिक वाढते. एकूणच रुग्ण घरी सुखरूप परतावा, यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात, हे देवरूप कार्य नव्हे का ? असा प्रश्न विजय खंदारे यांनी विचारला. औषधांशिवाय प्रोटीनयुक्त आहार, नाश्ता, पाणी या सुविधा नियमितपणे पुरविण्यात आल्या . रुग्ण संख्येत अचानक वाढ होत असताना थोडीफार गैरसोय झाली तर ती समजून घेण्याची भूमिका असावी, असे मत त्यांनी मांडले.

पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अमोल पाटील हे कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण तपासताना बाधित झाले. यवतमाळला भरती झाल्यानंतर त्यांनी स्वतः रुग्ण म्हणून उपचार घेतले. या कोविड वॉर्डात श्रीमंत-गरीब, डॉक्टर अथवा सामान्य असा कुठलाही भेदाभेद होत नाही, हा अनुभव त्यांनी घेतला. डॉ.पाटील म्हणाले, " शासनाची आरोग्य यंत्रणा मनापासून काम करते. हे सर्व उपचार, रुग्णांची ने-आण, सकस आहार विनामूल्य पुरविते. बाधित रुग्ण सुखरूप घरी परतावा,हाच त्यांचा मोटो असतो. महागड्या खाजगी रूग्णालयाच्या उपचारा व वाहन व्यवस्थेकडे बघितल्यास शासकीय यंत्रणा किती मौलिक कार्य करीत आहे याची खात्री पटते."

नक्की वाचा - रुग्ण हजार आणि मनुष्यबळ केवळ पंचावन्न! बहोत नाइन्साफी! मेयोच्या मनुष्यबळाच्या मागणीला अखेर यश

खरे म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. परंतु काहीवेळा वेळेत व पुरेशी काळजी घेतली नाही तर कोरोना रुग्ण कोसळतो, ही दुसरी बाजू ही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता, रोग प्रतिकार शक्ती वाढविणारा आहार या गोष्टींचे पालन करावयाचा आहे, असे मत डॉ. पाटील यांनी मांडले.

संपादन - अथर्व महांकाळ