तो गायीला वाचवायला गेला अन्‌ स्वतःचाच जीव गमावून बसला 

tiger
tiger

मूल (जि. चंद्रपूर) : वाघाच्या हल्ल्यात गुराख्यासह एक गाय ठार झाल्याची घटना तालुक्‍यातील बफर झोन क्षेत्रातील कक्ष क्रमांक 767 मधील करवन येथे घडली. ही घटना गुरुवारी (ता. 25) दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. मृताचे नाव रमेश वेलादी (वय 55, रा. करवन) असे आहे. 

बफर झोन क्षेत्र असलेल्या करवन येथे वाघांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याने येथे गावकऱ्यांच्या पुढाकाराने गुरेढोरे राखण्याचे काम आळीपाळीने चार-पाच जणांकडे आहे. गुरुवारी सकाळी येथील रमेश वेलादीसह इतर चारजण गुरांचा कळप घेऊन जंगलात गेले होते. दुपारी 12 वाजताच्या सुमारास दबा धरून असलेल्या वाघाने कळपातील एका गायीवर हल्ला चढविला. त्यात गाय जागीच ठार झाली. गायीवर वाघाने हल्ला केल्याने वेलादी याने आरडाओरड करून गायीला वाचविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात वाघाने गायीला सोडून रमेशवरच झडप घेतली. वाघाच्या हल्ल्यात तोसुद्धा जागीच ठार झाला. सोबत गेलेल्या इतर गुराख्यांनी गावात जाऊन या घटनेची माहिती वनविभागाला आणि गावकऱ्यांना दिली. 

वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी बोबडे, क्षेत्रसहायक जोशी, वनरक्षक वासेकर, बंडू परचाके तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मृताच्या कुटुंबीयांना तातडीची सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. 

वामनपल्लीत दोन जनावरांना केले ठार 

धाबा : वनविकास महामंडळ वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या वामनपल्ली येथील जंगलात वाघाच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 25) उघडकीस आली. ऐन शेती हंगामाच्या तोंडावर जनावरे दगावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या सोनापूर देशपांडे येथील गुरांचा कळप घेऊन गुराखी मारुती अलोने हे नेहमीप्रमाणे वामनपल्ली जंगलात चराईसाठी गेले होते. चराई करताना अचानक वाघाने हल्ला करून दोन बैल ठार केले. गुराखी अलोने यांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडला. त्यांनी कसेबसे कळपातील इतर जनावरांना घेऊन गाव गाठले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. ठार झालेली जनावरे महादेव गुंडावार, बंडू गुंडावार यांच्या मालकीची आहेत. गुरुवारी सकाळी गुराखी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले असता तिथे दोन बैल मृतावस्थेत आढळून आले. ऐन शेती हंगामात बैल दगावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com