पब्जीत आकंठ बुडाला, सोळा सोळा तास चालायचा गेम, अखेर निर्णायक क्षण आला आणि... 

Suicide of a teenager for pubgy game
Suicide of a teenager for pubgy game

नेर (जि. यवतमाळ) : नेर तालुक्‍यातील पिंपरी (मुखत्यारपूर) गावात आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास पब्जी या गेमच्या आहारी गेल्यामुळे निखिल पुरुषोत्तम पिलेवान (वय 22) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. 

कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण जग थांबून आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडता येत नाही. हाताला काम नाही. अशात देशात मोठ्या प्रमाणात नेट यूजरचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अगदी लहानग्यांपासून तर वयोवृद्धांपर्यंत बहुतेक जण आज अँड्रॉइड मोबाईल वापरत आहेत. एकीकडे लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचे काम या मोबाइलने जरी केले असले तरी यावर मोठ्या प्रमाणात गेम खेळण्याचे काम लहान बालक ते युवकांकडून होत आहे. 

मोबाईलवरील अनेक गेमचे व्यसन सध्या सर्वत्र लागले आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. उद्योग-व्यवसाय ही बंद पडले. त्यामुळे रिकाम्या वेळात मोबाईलचे व्यसन सर्वांना जडले आहे. मोबाईलवर विविध वयोगटातील व्यक्तींसाठी वेगवेगळे व भयानक गेम आहेत. एकदा का या गेमचे व्यसन जडले की त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होऊन जाते. आपण नेहमी वर्तमानपत्रातून या गेममुळे झालेल्या नुकसानीच्या बातम्या वाचतो.

मुलांकडून पालकांकडे गेम खेळण्यासाठी आग्रह धरला जातो. यामुळे बरेचदा वादही होतात. खटकेही उडतात. बालहट्टासमोर नमते घेत पालकही कटकटींपासून दूर व्हावे म्हणून मुलांना मोबाईल देऊन टाकतात. मग मुले तासन्‌तास या मोबाईलवरील गेममध्ये रममाण होऊन जातात. यातील अनेक गेम आत्महत्येसारख्या टोकाच्या दिशेने घेऊन जातात. त्यामुळे पालकांनी वेळीच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. 

नेर तालुक्‍यातील पिंपरी कलगाव येथील निखिल पुरुषोत्तम पिल्लेवान (वय 22) या युवकाने आज सकाळी दहाच्या सुमारास घरात कोणी नसताना पब्जी गेमच्या आहारी गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वभावाने अत्यंत शांत असलेला निखिल पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरीवर होता. गावाकडे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत त्याने पुढील शिक्षण काम करून सुरू ठेवले होते. लॉकडाऊनच्या आधी तो आपले बी.ए. फायनलचे पेपर देण्यासाठी गावाकडे आला होता. 

वडील पुरुषोत्तम पिल्लेवान यांच्याकडे सात एकर शेती आहे. आई पुष्पाबाई ग्रामपंचायत सदस्य असून, आई-वडील दोघेही शेती व शेतमजुरीची कामे करतात. मोठा मुलगा मितेश बकऱ्या चारण्याचे काम करतो. मागील तीन महिन्यांपासून निखिलच्या हाताला कुठलेही काम नसल्याने तो दिवस-रात्र पब्जी खेळातच रममाण रहायचा. दररोज तब्बल सोळा सोळा तास तो मोबाईलवर गेम खेळायचा.

या गेमच्या आहारी गेल्याने आज त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सकाळी घरी कोणी नसतात राहत्या घरात त्याने गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येची खळबळजनक घटना समजताच गावकऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. पब्जी गेममुळे आत्महत्या झाली असल्यासंदर्भात नेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी नेर पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पाल्यांसाठी पालक चिंतित 

सध्या सर्वत्र ऑनलाइन एज्युकेशनचे वारे वाहत आहे. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन एज्युकेशन प्रणाली पुढे येत आहे. या ऑनलाईन एज्युकेशनच्या आड विद्यार्थी विविध प्रकारचे गेम खेळताना दिसून येतात. या शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गेमच्या आहारी जात आहेत. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही अश्‍लील साईड्‌सही यावर अपलोड असतात. ते पाहून किशोरवयीन मुलांचे आयुष्यही उद्‌ध्वस्त होऊ शकते. या सर्व बाबींमुळे पालकांच्या काळजाचा ठोका वाढला आहे. 
 

सदर युवक सोळा सोळा तास मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होता. हाताला काम नसल्याने पूर्णपणे तो पब्जी गेमच्या आहारी गेला होता. पालकांनी आपल्या मुलांना यासारख्या गेमपासून दूर ठेवावे. 
प्रवीण सोनटक्के, उपसरपंच पिंपरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com