चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे बनले शोभेच्या वास्तू... सांगा केव्हा मिळणार सिंचनाचा लाभ

श्रीकांत पेशट्टीवार
Sunday, 13 September 2020

बहुतेक ठिकाणचे कोल्हापुरी बंधारे शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. अनेक कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी पाट्या चोरट्यांनी पळविल्या आहेत. सिंचन विभाग आणि पाणीवाटप संस्थांत समन्वय नसल्याने कोल्हापुरी बंधाऱ्याचे व्यवस्थापन सध्या कोलमडले आहे.

चंद्रपूर : कोट्यवधी रुपये खर्चून जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र, सिंचन विभाग, पाणीवाटप संस्थांत समन्वय नसल्याने कोल्हापुरी बंधाऱ्यांचे व्यवस्थापन बिघडले आहे. बहुतेक ठिकाणचे कोल्हापुरी बंधारे शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या लोखंडी पाट्या चोरट्यांनी पळविल्या आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभही मिळत नाही.

शेतीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू केला. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६२९ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. जिल्हा मृद संधारण कार्यालयाअंतर्गत ३५० सीएनबी, १०० हेक्‍टर खालील क्षमतेचे ६०, तर यावरील क्षमतेचे २५ कोल्हापुरी बंधारे आहेत.

बंधाऱ्याच्या लोखंडी पाट्या गेल्या चोरीस

यातील काही कोल्हापुरी बंधारे स्थानिक सहभागातून चांगल्या नियोजनामुळे सिंचनाकरिता उपयोगी ठरत आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणचे कोल्हापुरी बंधारे शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. अनेक कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी पाट्या चोरट्यांनी पळविल्या आहेत. सिंचन विभाग आणि पाणीवाटप संस्थांत समन्वय नसल्याने कोल्हापुरी बंधाऱ्याचे व्यवस्थापन सध्या कोलमडले आहे.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले...

५४ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे सिमेंट प्लगमध्ये रूपांतर

अनेक बंधाऱ्यांची दुरुस्ती करून त्याचे सिमेंट प्लग बंधाऱ्यात रूपांतर करण्याची मागणी कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने ५४ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे सिमेंट प्लग बंधाऱ्यात रूपांतर केले आहे. निधीची उपलब्धता आणि तांत्रिक बाबू तपासून टप्प्याटप्प्याने आणखी कोल्हापुरी बंधाऱ्याचे सिमेंट प्लग बंधाऱ्यात रूपांतर करण्यात येणार आहेत.

असं घडलंच कसं - कपाशीला जडलाय पातीगळतीचा आजार; शेतकरी संकटात

देखभाल, दुरुस्तीच्या निधीची अडचण

पश्‍चिम महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. मात्र, तेथील बंधाऱ्यांमुळे शेतशिवार उन्हाळ्यातही हिरवेगार दिसते. मात्र, पूर्व विदर्भाच्या भागात बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीस अडचणी येत आहेत. मोठा निधी खर्च होऊनही अपेक्षित सिंचनाचे ध्येय साध्य झाले नाही, हे वास्तव आहे. बंधाऱ्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा निधी कमी प्रमाणावर मिळतो. हे त्याचे एक मोठे कारण आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The management of Kolhapuri dam collapsed