शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर मॉन्सून विदर्भात दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

दरवर्षी मॉन्सून कोकणमार्गे पूर्व विदर्भात दाखल होतो. यावेळीही मॉन्सूनने याच मार्गाने प्रवेश केला. मात्र यावेळी अपेक्षेपेक्षा एक-दोन दिवस लवकर आगमन झाल्याने वैदर्भीयांना सुखद धक्‍काही दिला.

नागपूर : उन्हाच्या झळा असह्य झाल्या होत्या. शेतातली माती पावसाच्या निर्मळ धारांसाठी आसुसली होती. विदर्भातील शेतकरी त्याची चातकाप्रमाणे वाट पाहात होता, आणि अखेर तो आला आणि अगदी वेळेत आला. मॉन्सूनने शुक्रवारी विदर्भात धडाक्‍यात "एंट्री' केली. प्रादेशिक हवामान विभागानेही मॉन्सूनच्या आगमनावर शिक्‍कामोर्तब केले. यंदा अपेक्षेप्रमाणे लवकर मॉन्सूनचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून, पेरण्यांचीही लगबग सुरू झाली आहे.
दरवर्षी मॉन्सून कोकणमार्गे पूर्व विदर्भात दाखल होतो. यावेळीही मॉन्सूनने याच मार्गाने प्रवेश केला. मात्र यावेळी अपेक्षेपेक्षा एक-दोन दिवस लवकर आगमन झाल्याने वैदर्भीयांना सुखद धक्‍काही दिला. गडचिरोली व इतर जिल्ह्यांमध्ये दणक्‍यात सलामी दिल्यानंतर नागपुरातही सायंकाळी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मान्सूनने दमदार हजेरी लावली. आजचा पाऊस मॉन्सूनचाच असल्याचे हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी सांगितले. मात्र नागपुरात मॉन्सून अद्याप दाखल झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवसभर ऊन तापल्यानंनर सायंकाळी चारनंतर अचानक काळेकुट्‌ट आभाळ दाटून आले. शहरातील अनेक भागांमध्ये बराच वेळपर्यंत मॉन्सून सरी जोरात बरसल्या. पावसामुळे वातावरणही आल्हाददायक होऊन उकाड्यापासून दिलासा मिळाला. मॉन्सूनमुळे बळीराजाही मशागत व पेरण्यांच्या कामाला लागला आहे.

सविस्तर वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन...

मॉन्सूनने गडचिरोली जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. येथे तब्बल 83 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय यवतमाळ (46 मिलिमीटर), अमरावती (33.4 मिलिमीटर), वाशीम (25 मिलिमीटर) व अकोला (18.1 मिलिमीटर) येथेही मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. गेल्या दहा वर्षांचा इतिहास बघितल्यास, विदर्भात यावर्षी तिसऱ्यांदा मॉन्सूनचे लवकर आगमन झाले. यापूर्वी 2018 मध्ये 8 जूनला, तर 2013 मध्ये 9 जून रोजी मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mansoon reached at Vidarbha