esakal | कडक निर्बंधात व्यवसाय बदलण्याची वेळ; कोणी विकतो भाजीपाला, तर कोणी करतो फळविक्री

बोलून बातमी शोधा

vegetables market
कडक निर्बंधात व्यवसाय बदलण्याची वेळ; कोणी विकतो भाजीपाला, तर कोणी करतो फळविक्री
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कारोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत भाजीपाला, किराणा, फळविक्री, दुग्धजन्य पदार्थ विक्रीवगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे काही कामगारांच्या हाताला काम असले; तरी पूर्ण रोजी मिळत नाही. तर, ज्यांचे दुकान बंद आहे, त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. कोरोनामुळे अनेकांवर व्यवसाय बदलण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: दहा वर्षांपासून अंथरुणावर, निरनिराळे संसर्ग; पण घरातच उपचार घेत केली कोरोनावर मात

गेल्या वर्षी कोरोनामुळे पाच ते सहा महिने कामगारांच्या हाताला काम मिळू शकले नाही. या संकट काळात कामगार, कष्टकरी कसेबसे जगले. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच बाजारपेठ व व्यवहार सुरळीत येण्यापूर्वीच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. संसर्ग रोखण्यासाठी सहा एप्रिलपासून राज्य सरकारने निर्बंध लादायला सुरुवात केली. २२ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. बाजाराच्या वेळेतही बदल करण्यात आला. सकाळी सात ते ११ या वेळेतच घराबाहेर खरेदीसाठी बाहेर पडायची मुभा देण्यात आली. दुसऱ्या लाटेतही अनेकांच्या हातचा रोजगार गेला. कुटुंबाला जगविण्यासाठी काम तर करावेच लागेल, म्हणून काहींनी पुन्हा आपला मोर्चा भाजीपाला, फळविक्रीकडे वळविला. गिऱ्हाईक कमी व विक्रेते जास्त अशी स्थिती बाजारपेठेत बघावयास मिळत आहे. मात्र, मालाचे पैसे निघून दोन पैसे हातात पडावे, यासाठी विक्रेत्यांची चार तासांत धडपड चालत असल्याचे बघावयास मिळते.

आपले गावच बरे -

कडक निर्बंधामुळे हातचे काम गेले. शहरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. हाताला कामच नसल्याने घर भाड्याचे पैसे द्यायचे तरी कुठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश कामगारांनी आपले गावच बरे म्हणून गावचा रस्ता पकडला आहे. गावात शेतीवाडीची अथवा मिळेल ते काम करण्यावर कष्टकरी वर्गाचा भर आहे.