esakal | दहा वर्षांपासून अंथरुणावर, निरनिराळे संसर्ग; पण घरातच उपचार घेत केली कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

prakash chikare

दहा वर्षांपासून अंथरुणावर, निरनिराळे संसर्ग; पण घरातच उपचार घेत केली कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सकारात्मकता, जबरदस्त इच्छाशक्ती, योग्य उपचाराची साथ असेल तर कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावरही सहज विजय मिळविता येऊ शकतो. म्हाळगीनगर येथील चिकारे परिवाराने हे सिद्ध करून दाखविले. अपघातामुळे गेल्या दहा वर्षांपासून अंथरुणावर आलेल्या प्रकाश चिकारे यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, हिंमत न हारता त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्‍याने घरीच उपचार घेत या जीवघेण्या आजारावर मात केली.

हेही वाचा: वाघिणीची शिकार करणाऱ्या दोघांच्या मुकुटबन पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोन फरार

५८ वर्षीय प्रकाश यांचा फोटो स्टुडिओ होता. एकेदिवशी (२०१० मध्ये) दुचाकीने जात असताना तुकडोजी चौकात भरधाव वाहन चालविणाऱ्या तरुणांनी त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. त्यामुळे तीनवेळा शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, त्याउपरही ते बरे झाले नाही. मेंदूची नस डॅमेज झाल्याने शरीराचा डावा भाग लुळा पडून अंथरुणाला खिळले. भीषण अपघातानंतर अनेक प्रकारचे इन्फेक्शन झाले. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली. या धक्क्यातून हळूहळू सावरत असतानाच कोरोनाची लागण झाली. घरातील इतरांनाही कोरोनाची लक्षणे दिसत होती. मात्र, वडिलांच्या तब्येतीच्या काळजीने कुणीही चाचण्या केल्या नाहीत. रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला पण पैशाच्या अडचणीमुळे त्यांनी घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. औषधांबरोबर सलाईन आणि ऑक्सिजनचीही सोय केली. अखेर तीन आठवड्यांच्या संघर्षानंतर प्रकाश यांनी कोरोनाला पराभूत केले.

कोरोनामुळे घाबरू नका -

तीन आठवड्यांचा अनुभव सांगताना प्रकाश यांची कन्या पल्लवी म्हणाली, तीन आठवड्यांचा काळ आम्हा सर्वांसाठी खूप भयानक होता. बाबांची तब्येत खूप खराब होती. मात्र, खचलो नाही. कोरोनातून बरे होता येते, असा आम्हाला विश्वास होता. कदाचित त्यामुळेच आम्ही बाबांना या आजारातून सहीसलामत बाहेर काढू शकलो. सकारात्मक राहून आलेल्या संकटाचा धैर्याने सामना केल्यास कोरोनासारख्या गंभीर आजारावर निश्चितच मात करता येऊ शकते.