भीषण वास्तव! ९० हजार १४९ विद्यार्थ्यांकडे नाही स्मार्टफोन, ऑनलाइन शिक्षणाची ऐशीतैशी

online
online

गडचिरोली : कोरोना संसर्गामुळे सरकारची सगळी भिस्त ऑनलाइन शिक्षणाकडे आहे. पण, यात स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरी लोकांचाच विचार केल्याचे दिसून येत आहे. कारण, गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ८१. ५२ टक्‍के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्याचे धक्‍कादायक वास्तव शिक्षण विभागाच्याच सर्वेक्षणातूनच पुढे आले आहे. असे असतानाही या भीषण वास्तवाला बगल देत ऑनलाइन शिक्षणाचे लंगडे घोडे पुढे दामटणे सुरूच आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या २०४४ शाळा आहेत. या शाळांमध्ये १ लाख ८९ हजार ७६६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी तब्बल ९० हजार १४९ विद्यार्थ्यांच्या पालकांकडे डिजिटल साधन नाही. केवळ ३५ हजार ९५ पालकांकडे स्मार्टफोन आहे. त्यातील ७० टक्‍केच्या वर पालक शहरात राहणारे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ८१.५२ टक्‍के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे कोणत्याही प्रकारचे स्मार्टफोन नसल्याची ही आकडेवारी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. ऑनलाइन शिक्षणाची सक्ती करण्याचा फतवा काढणाऱ्या सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील या परिस्थितीचा विचारच केला नाही का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, धानोरा, कोरची, मुलचेरा, अहेरी आदी तालुक्‍यांतील अनेक गावांत नेटवर्क नाही. अनेक ठिकाणचे टॉवर बंद अवस्थेत आहेत. आदिवासी भागातील अनेक पालकांकडे जुन्या पद्धतीचे मोबाईल फोन असून नेटवर्कच्या त्रासामुळे त्यांनी मोबाईलचा वापर बंद केला आहे. ८९० पालकांकडे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंपैकी फक्त रेडिओ हेच साधन आहे. या अवस्थेत आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था कशी होणार, हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे.

शाळांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल, त्यांना मास्क उपलब्ध करून दिले जातील, अंतरावर बसवले जाईल, शाळा सॅनिटाइझ केल्या जातील, असे सांगून जिल्हा परिषदेच्या काही शाळा सुरू केल्या गेल्या. मात्र यातील काहीच व्यवस्थित उपलब्ध करून देता न आल्याने नंतर काही ठिकाणी पालकांच्या विरोधामुळे त्या बंद करण्यात आल्या. तथापि अनेक ठिकाणी अजूनही शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग आग्रही असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी बऱ्याच आधीपासून ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र आरटीई अंतर्गत प्रवेश झालेल्या पाल्यासह ग्रामीण भागातील अनेक पालक आपल्या पाल्यांना अजूनही स्मार्टफोन उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. तरीही ऑनलाइन शिक्षणावरच भर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राघवेंद्र मुनघाटे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

याचाही विचार व्हावा
आदिवासी विकास विभागाने शिक्षण 'अनलॉक पॅटर्न' सुरू करीत गावातीलच सुशिक्षित बेरोजगार युवकांना " विद्यार्थी मित्र " बनवून त्यांच्याद्वारे मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मात्र, कोरोना काळात अनेकांच्या हातचा रोजगार हिरावला गेला असताना आणि अशा बेरोजगारांना रोजगाराची नितांत गरज असतानाही या विद्यार्थी मित्रांनी केवळ सेवाभावी वृत्तीने विनामोबदला काम करावे, असे निर्देश असल्यामुळे त्यांचा उत्साह मंदावला आहे. खरेतर या युवकांना चांगले मानधन दिल्यास त्यांच्या रोजगाराची आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होऊ शकेल. म्हणून या पर्यायाचा विचार होणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

कुठून आणणार स्मार्टफोन
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यात गरीब पालक आपल्या मुलांना स्मार्टफोन कसे घेऊन देणार ? त्यांच्या अडचणी लक्षात न घेता ऑनलाइन शिक्षणाची सक्ती करण्यात आली. पालक स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नसल्यामुळे अनेक ठिकाणी पालक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आहे. शहरी व सुखवस्तू विद्यार्थ्यांबद्दल गरीब विद्यार्थ्यांच्या मनात वेगळ्या प्रकारचा आकस निर्माण होत चालला आहे. ही वैषम्याची दरी कशी भरून काढणार ? शाळांचे ठोस नियोजन नसल्याने ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
 प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, संस्थापक, स्पर्श सामाजिक संस्था, गडचिरोली

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com