अभिव्यक्तींसाठी माजी अर्थमंत्री सिन्हांचा ‘राष्ट्रीय मंच’

अनुप ताले 
रविवार, 28 जानेवारी 2018

अकोला - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी केवळ सोळा महिने उरले असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी नवा राष्ट्रीय मंच निर्माण केला आहे. स्वतःच्या पक्षाद्वारे दुर्लक्षित आणि धुमसत असलेले अनेक दिग्गज नेते या नव्या समीकरणांचा भाग होणार आहेत. त्यात अकोल्यातील शेतकरी जागर मंचचे विजय देशमुख व प्रशांत गावंडे यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून, मंगळवारी (ता. ३०) मंचची पहिली बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.

ज्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षांतर्गत त्यांचे मत किंवा विचार मांडता येत नाहीत तसेच सामाजहिताचे निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेता येत नाही, त्यांच्यासाठी उघड मतप्रदर्शन करता यावे म्हणून, या व्यासपीठाची निर्मिती केली जात असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुका जवळ येत असताना आणि भाजपची देशाच्या राजकारणात चांगली पकड असताना, पक्षांतर्गत नाराज व आंदोलक नेत्यांचा किंवा विरोधकांचा मिळून राष्ट्रीय मंच स्थापन करण्यामागे नेमका हेतू काही वेगळाच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मंच बनविण्याकरिता महात्मा गांधींच्या ७० व्या पुण्यतिथीची (३० जानेवारी) तारीख निश्चित करण्यात आली आहे. या फोरमद्वारे राष्ट्रीय महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा राष्ट्रीय मंच केंद्रीय अर्थसंकल्प सत्राच्या पूर्वसंध्येला लॉन्च केला जात आहे. तो सरकारच्या विरोधात मोठे व्यासपीठ बनू शकतो. विशेष म्हणजे, राष्ट्रीय मंचात सहभागी होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला ते असलेल्या पक्षाचे सदस्यत्व सोडणे आवश्यक नाही. या मंचाद्वारे लोक मुक्तपणे बोलू शकतील. 

राष्ट्रीय मंच यशवंत सिन्हा तयार करीत असलेल्या राष्ट्रीय मंचावर काँग्रेस नेते मनीष तिवारी, आम आदमी पार्टीचे आशुतोष, आशीष खेतान, जनता दल युनायटेडचे नेते पवन वर्मा, समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी, तृणमुल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेनन तसेच महाराष्ट्रातून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, नुकताच भाजपाचा राजीनामा दिलेले खासदार नाना पटोले, आमदार विकास कुंभारे, आशिष देशमुख, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, विजय देशमुख यांच्यासह, सामाजिक आणि शेतकरी संघटनेतील मोठे नेते जुळणार असल्याची चर्चा आहे.

अकोल्यातील आंदोलनातून ठिणगी 
काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांचे हक्क, त्यांच्या मागण्यांसाठी यशवंत सिन्हा यांनी शेतकरी जागर मंचच्या आयोजनात बेमुदत आंदोलन केले होते. या आंदोलनाला देशव्यापी सहभाग मिळाल्याने महाराष्ट्र सरकारला नमते घेत मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्‍या. याचवेळी शेतकरी हितासाठी नवा मंच स्थापन केला जाणार असल्याचे सांगितले जात होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ex finance minister create national manch