आर्वीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजेश सोलंकी
बुधवार, 3 जानेवारी 2018

आंबेडकरवाद्यांनी बुधवार (ता. 3) रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याने आज शहरातील नागरिक संभ्रमात होते. अनेक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी संख्या तुरळक होती.

आर्वी : कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेधार्थ आर्वी शहर आणि तालुक्यातील व्यवसायिकांनी व्यापारी प्रतिष्ठाण उत्स्फूर्तपणे बंद ठेऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, बाहेर गावचे प्रवासी, छोटे व्यवसायिकांना याचा फटका बसला.

आंबेडकरवाद्यांनी बुधवार (ता. 3) रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याने आज शहरातील नागरिक संभ्रमात होते. अनेक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी संख्या तुरळक होती. तसेच बसेसची वाहतूक सुरळीत नसल्याने अनेक प्रवासी खासगी वाहन, दुचाकीने प्रवास करीत होते. दुपारी तीननंतर सर्व सुरळीत झाले.

कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या घटनाची सीबीआय चौकशी करावी आणि यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या लोकांना आर्थिक भरपाई द्यावी, ३०२ कलम आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने आर्वी उपविभाग अधिकाऱ्यांमार्फत मंगळवारी (ता .२) मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला देण्यात आले. 

आज बुधवारी (ता ३) जनतानगर आंबेडकर वॉर्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला वंदन करुन मुख्य मार्गावरुन शेकडो युवकांनी मोर्चा काढत घोषणाबाजी केली. मात्र, काही युवकांनी येथील 
बाजारातील भाजीपाला दुकानातील माल बाहेर फेकला. त्यामुळे अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिली.

या घटनेचा निवेदनाद्वारे शांततेने निषेध करावा, अशाप्रकारच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. पोलिसांनी सतर्कता दाखवत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: marathi news local news best response for bandh vardha news