गरजूंना मदत करा : डॉ. प्रकाश आमटे

राजेश सोलंकी
रविवार, 31 डिसेंबर 2017

माझे जीवन हे तुमच्यासमोर आहे. तुमच्यासाठी प्रेरणा आहे. मी एवढ्या दूर आलो तुम्हाला भेटायला. तुम्ही यातून काही बोध घ्यावा. गरिब-गरजूंना  मदत करा. समाजासाठी तुम्ही सेवा दिली तरच मी येथे आल्याची फलश्रुती मिळेल

आर्वी : वडिलांच्या प्रेरणेने विवाहाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी हेमल कसा आदिवासीयांच्या जीवनकामासाठी सुरवात केली. कारण गरिबी, उपासमार, अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव, ही सर्व परिस्थिती पाहिली आणि मी व माझ्या पत्नीने वैद्यकीय सेवेपासून तर पुनर्वसनापर्यंत त्यांच्यासाठी शक्य होईल, ते सर्व करण्यासाठी जीवनाचे योगदान दिले. माणसाचे जीवन कसे असते, हे त्यांना जगायला शिकविले. माझे जीवन हे तुमच्यासमोर आहे. तुमच्यासाठी प्रेरणा आहे. मी एवढ्या दूर आलो तुम्हाला भेटायला. तुम्ही यातून काही बोध घ्यावा. गरिब-गरजूंना  मदत करा. समाजासाठी तुम्ही सेवा दिली तरच मी येथे आल्याची फलश्रुती मिळेल, असे प्रतिपादन समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.

आर्वी तालुक्यातील सोरटा येथे शनिवार ( ता ३०) कै. मंदाताई वनसकर बहु. ग्रामविकास संस्थेचे वतीने 'प्रकाशपर्व'  या कार्यक्रमाचे आयोजन मॉडेल हायस्कूल प्रांगणात करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार अमर काळे होते. प्रसिध्द समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे प्रमुख अतिथी होत्या. संस्थेचे अध्यक्ष पुनेश्वर वनस्कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदचे सदस्य ज्योती निकम, जि.पं. सदस्य वैजयंती वाघ, शेतकरी नेते गजानन निकम, पं. स. सदस्या अरुणा सावरकर, पुलगांव मिलिटरी कँपचे सुरक्षा अधिकारी मेजर वैभव वर्मा, सरपंच अर्चना आंबेकर, थानेदार मुरलीधर बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा भाषणाचा कार्यक्रम नाही, हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे, असे विशद करून आयुष्याच्या वाटचालीची उकल डॉ. प्रकाश आमटे यांनी केली.

आर्वी विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा अशी थोर समाजसेवी व्यक्ती आली, हे आमचे भाग्य आहे. अहोरात्र झिजून प्राणी माणसे या सगळ्यांना आपलेसे केले. त्याला जगात तोड नाही. त्याची प्रेरणा आणि बोध घेऊन प्रत्येक नागरिकाने गरिब गरजूंची सेवा केलीच पाहिजे, असे आमदार अमर काळे यांनी सांगितले.

पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे डॉ. मंदाकिनी आमटे या उभयतांचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन कै. मंदाताई वनस्कर संस्था आयोजक, सिटी पब्लिक स्कूल, पुलगांव मिलिटरी कँप, पोलिस ठाणे, मॉडेल हायस्कूल, आमदार अमर काळे, आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक आयोजक गजानन वनस्कर यांनी केले. सूत्रसंचालन सुबोध चचाने यांनी केले तर पुंडलिक मंडवे यानी आभार मानले.

Web Title: marathi news local news help needy peoples says dr prakash amate