मोबाईलच्या हट्टापायी विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

नागपूर - वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्यामुळे निराश झालेल्या १४ वर्षीय मुलाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी पाचपावलीतील बारसेनगरात उघडकीस आली. संचित संजय वाघमारे (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

नागपूर - वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्यामुळे निराश झालेल्या १४ वर्षीय मुलाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी पाचपावलीतील बारसेनगरात उघडकीस आली. संचित संजय वाघमारे (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

संजय वाघमारे हे बारसेनगरात कुटुंबासह राहतात. ते हातमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. त्यांचा मुलगा संचित हा सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकतो. अभ्यासात हुशार असलेल्या संचितला मोबाईलचे वेड होते. तो नेहमी मित्राच्या मोबाईलवर खेळत असायचा. त्याच्या जवळपास सर्वच मित्रांकडे स्मार्टफोन होता. त्यामुळे वडिलांना स्मार्टफोन घेऊन मागण्याची कल्पना मित्रांनी त्याला सुचवली. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून तो वडिलांना मोबाईल घेऊन मागत होता. मात्र, तुटपुंज्या कमाईत वडिलांना मोबाईल घेऊन  देणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मुलाची समजूत घालून त्याची मनधरणी वडील करीत होते. मात्र, मित्रांकडे मोबाईल बघून त्यालाही मोबाईलची उणीव भासत होती. त्यामुळे तो रोज आईकडे मोबाईलसाठी हट्‌ट धरायचा. मोबाईल विकत घेणे शक्‍य होत नसल्याचे लक्षात येताच संचित निराश झाला. गेल्या आठ दिवसांपासून तो तणावात वावरत होता. त्यामुळे संचितने  शनिवारी सकाळी घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाईलचा अतिवापर टाळा 
आजच्या तरुणाईमध्ये मोबाईलचा अतिवापर होत आहे. सतत मोबाईलवर असल्यामुळे कुटुंब संस्थेसाठीसुद्धा घातक ठरत आहे. अनेक जण व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर ऑनलाइन राहतात. त्यामुळे घरात मुलांवर त्यांचे लक्ष नसते. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये नैराश्‍य येते. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ देत आहेत.

सायकलिस्ट व्हायचे स्वप्न अपूर्ण
संचित वाघमारे सहाव्या वर्गापासून सायकलवर स्टंटबाजी करीत होता. तसेच त्याला वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढण्याची सवय होती. त्याचे मॉडेलिंग केलेले फोटो फेसबुकवर पोस्ट केलेले आहेत. तसेच त्याला सायकलिस्ट बनून शांतीचा संदेश देशभरात पोहचवायचा होता. त्यासाठी तो सायकलिंगचे मित्रांकडून ट्रेनिंगही घेत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news student suicide nagpur crime