अकोला स्थायी समितीत दहा नवीन चेहरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

महापालिका स्थायी समितीचा एक वर्षांचा कार्यकाळ ता. 1 मार्च 2018 ला पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच स्थायी समितीच्या सभेत अर्धे म्हणजे आठ सदस्य ईश्‍वर चिठ्ठीने निवृत्त करण्यात आले होते. त्यात भाजपचे पाच, काँग्रेस, शिवसेना आणि लोकशाही आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. याशिवाय काँग्रेस व लोकशाही आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याने राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या दहा जागांवर महापालिकेच्या विशेष सभेत नवीन सदस्य निवडण्यात आले.

अकोला - महापालिका स्थायी समितीचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालेल्या आठ व राजीनामा देणाऱ्या दोन सदस्यांच्या जागी दहा नवीन चेहरे बुधवारी (ता. २८) निवडण्यात आले. सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी दिलेली नावे भाजपचे गटनेते राहुल देशमुख यांनी वाचून दाखविली आणि महापौर विजय अग्रवाल यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. 

महापालिका स्थायी समितीचा एक वर्षांचा कार्यकाळ ता. 1 मार्च 2018 ला पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच स्थायी समितीच्या सभेत अर्धे म्हणजे आठ सदस्य ईश्‍वर चिठ्ठीने निवृत्त करण्यात आले होते. त्यात भाजपचे पाच, काँग्रेस, शिवसेना आणि लोकशाही आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. याशिवाय काँग्रेस व लोकशाही आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याने राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या दहा जागांवर महापालिकेच्या विशेष सभेत नवीन सदस्य निवडण्यात आले. यामध्ये माजी महापौर विनोद मापारी यांना आता भाजपतर्फे स्थायी समितीमध्ये जागा मिळाली आहे. उषा विरक या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांना लोकशाही आघाडीतर्फे स्थायी समितीमध्ये पाठविण्यात आले. या आघाडीतर्फे भारिप-बमसंच्या गटनेत्या डॉ. धनश्री देव यांनाही स्थायी समितीमध्ये जागा मिळाली आहे. शिवसेनेतर्फे मंजुषा शेळके यांची निवड करण्यात आली. त्या शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांची जागा घेतील. याशिवाय भाजपतर्फे अर्चना म्हैसने, नंदा पाटील, शारदा खेडकर, अनिल गरड यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसतर्फे इरफान अब्दुल आणि शाहीन मेहबुब अंजूम यांची निवड करण्यात आली. 

दोघांचा राजीनामा - 
काँग्रेसचे अॅड. इकबाल सिद्धीकी आणि लोकशाही आघाडीतील एमआयएमचे सदस्य मोहमंद मुस्तफा यांनी पक्षाच्या धोरणानुसार एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे राजीनाम दिला. त्यांच्या जागेवर काँग्रेसतर्फे शाहीन मेहबुब अंजुम यांची तर लोकशाही आघाडीतर्फे उषा विरक यांची निवड करण्यात आली.    

आता सभापतीपदासाठी रस्सीखेच -
स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांसह राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या दोन सदस्यांच्या जागी नवीन दहा सदस्य स्थायी समितीमध्ये आले आहेत. जुने सहा सदस्य कायम आहेत. जुने व नवीन सदस्यांमधून  सभापती निवडण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपच्या दहा सदस्यांपैकी कुणाची वर्णी स्थायी समिती सभापतीपदावर लागणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तुर्तास तरी सुनील क्षीरसागर, अर्चना म्हैसने आणि विनोद मापारी यांची नावे आघाडीवर आहेत. 

स्थायी समितीत महिलांचे वर्चस्व - 
महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये आता एकूण दहा महिला सदस्य झाल्या आहेत. दुसऱ्या वर्षाकरिता निवड झालेल्या सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या सर्वाधिक असल्याने सभापतीपदावरही महिला सदस्यांनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे महापाैरांचे निकटवर्तीय अर्चना जयंत म्हैसने यांचे पारडे जड मानले जात आहे.

या सदस्यांची झाली निवड -
० भाजप 
अर्चना म्हैसने, नंदा पाटील, शारदा खेडकर, विनोद मापारी, अनिल गरड.  
० शिवसेना  
मंजुषा शेळके. 
० लोकशाही आघाडी
डॉ. धनश्री देव-अभ्यंकर, उषा विरक.
० काँग्रेस 
इरफान अब्दुल रहेमान मोहमंद, शाहीन मेहबूब अंजुम. 

हे सदस्य आहेत कायम -
० भाजप 
बाळ टाले, विशाल इंगळे, सुनील क्षीरसागर, पल्लवी मोरे, सुजाता अहिर. 
० लोकशाही आघाडी 
मो. मुस्तफा (एमआयएम) 
० काँग्रेस 
डॉ. इकबाल सिद्धिकी. 
० शिवसेना 
सपना नवले.

या सदस्यांची निवृत्ती - 
० भाजप 
हरीश आलिमचंदानी, अजय शर्मा, सुमनताई गावंडे, योगिता पावसाळे, माधुरी बडोणे. 
० काँग्रेस 
पराग कांबळे. 
० शिवसेना
राजेश मिश्रा. 
० लोकशाही आघाडी 
खान फयाज अब्दुल्ला खान (राष्ट्रवादी काँग्रेस)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidarbha akola standing committee corporation elections