राम कदम, नीरव मोदींना घेऊन जा रे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

नागपूर - अनिष्ट प्रथा, रीती, परंपरांविरुद्ध सव्वाशे वर्षांहूनही अधिक काळापासून सुरू असलेली मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा यंदाही नागपूरकरांनी कायम राखली. पोळ्याच्या पाडव्याला संपूर्ण वैदर्भीयांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आजच्या मारबत उत्सवावर घोटाळे, मंदिर तोडण्याची कारवाई, महागाईची छाप दिसून आली.

नागपूर - अनिष्ट प्रथा, रीती, परंपरांविरुद्ध सव्वाशे वर्षांहूनही अधिक काळापासून सुरू असलेली मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा यंदाही नागपूरकरांनी कायम राखली. पोळ्याच्या पाडव्याला संपूर्ण वैदर्भीयांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आजच्या मारबत उत्सवावर घोटाळे, मंदिर तोडण्याची कारवाई, महागाईची छाप दिसून आली. घोटाळेबाज, अच्छे दिनचे  खोटे स्वप्न दाखविणाऱ्यांना घेऊन जा गे मारबत..’च्या घोषणा देत महागाई, रोगराई, भ्रष्टाचार, काळा पैसा यावर प्रहार करीत जागनाथ बुधवारी सुरू झालेली पिवळी तर नेहरू पुतळ्यापासून सुरू झालेल्या काळ्या मारबतीचे सायंकाळी नाईक तलाव परिसरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत  दहन झाले. यंदा डझनभर बडगे आणि अर्धा डझन मारबतींचा मिरवणुकीत समावेश होता.

मारबत व बडग्या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आजही मध्य व पूर्व नागपुरात उत्साह व तरुणाईच्या जोशाला उधाण आले होते. जागनाथ बुधवारी येथील तऱ्हाणे तेली समाज पिवळी मारबत उत्सव समितीतर्फे सकाळी पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. त्याचवेळी नेहरू पुतळा इतवारी येथून काळी मारबत उत्सव समितीतर्फे काळी मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. विविध बडगा उत्सव समितीच्या बडग्यांचाही त्यात समावेश झाला. रोगराई, भ्रष्टाचाराला घेऊन जागे मारबत म्हणत लाखोंचा जनसमुदाय नाचत गात मिरवणुकीत सहभागी झाला होता. पिवळी मारबत व काळ्या मारबतीची शहीद चौकात गळा भेटी झाली आणि त्यानंतर उत्साहाला आणखीच उधाण चढले. 

काळी, पिवळी मारबत, बडग्यांची मिरवणूक, त्यात सहभागी उत्साही तरुणांचे डीजेच्या तालावरील नृत्याने इतवारी सराफा बाजार, केळीबाग रोडवरील दोन्ही बाजूच्या इमारतीवरून बघणाऱ्यांचेही पाय थिरकले. जागनाथ बुधवारी, पाचपावली, गोळीबार चौक, नेहरू पुतळा, दलाल चौक, मारवडी चौक, जुने बस स्थानक, शहीद चौक, महाल कोतवाली, गांधीगेट अग्रसेन चौक, भारत माता चौक, तांडापेठ व शेवटी नाईक तलावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मारबत, बडगे बघणाऱ्यांच्या गर्दीने या परिसराला ‘मेगा ब्लॉक’चे स्वरूप आले होते.

गुलालाची उधळण, संदल, ढोल-ताशांचा गजर, बेधुंद तरुणाईचे नृत्याने मिरवणुकीला चांगलाच  रंग चढला. विशेषतः गांधी चौकात शहरातीलच नव्हे तर विदर्भातील लोकांनी मुलांसह मारबत, बडगा बघण्याचा आनंद घेतला. संग्राम बडग्या उत्सव मंडळाने राम कदम यांचा बडग्या काढून त्यांच्या महिलांबाबतच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविला. बालमित्र बडग्या उत्सव मंडळ, गंजीपेठतर्फे नीरव मोदीचा बडग्या काढून पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्याकडे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीतर्फे मंदिर तोडणारा मोगलशाही बडग्या काढून सामान्यांच्या मनातील खदखद मांडली. 

पेट्रोल, सिलिंडर दरवाढीवर प्रहार करण्यास ‘मित्रो, भाईयो और बहनो, या शब्दांद्वारे कुणाचेही नाव न घेता विशिष्ट अंगुलीनिर्देश केला. लालगंजच्या युवाशक्ती बडग्या उत्सव मंडळानेही अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्याचा बडग्या काढण्यात  आला. गंजीपेठच्या शिवशक्ती बाल बडग्या उत्सव मंडळाने बडग्या स्वरूपात मनपात कंत्राटी कामगार नियुक्तीच्या पद्धतीचा निषेध नोंदविला. श्री बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळ, बडग्या उत्सव समिती व अन्य एका मंडळाने एसएनडीएल, ओसीडब्ल्यूच्या मनमानी कारभाराकडे लक्ष वेधण्यासह जातिवादावर प्रहार केला. सार्वजनिक बडग्या उत्सव मंडळाने ‘बांगलादेशी भगाओ’ची मागणी बुलंद केली.

भालदारपुऱ्यातील बाल उत्सव बडग्या मंडळाने कुंभकर्णी झोपेत असलेला मनपाचा आरोग्य विभाग, विभागातील भ्रष्ट कर्मचारी आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या नेत्याकडे बोट दाखविले. विदर्भ क्रांती दल बडग्या उत्सव मंडळाने यंदा पुन्हा वेगळ्या विदर्भाची तसेच हलबा समाजाला न्याय देण्याची मागणी रेटली. 

मानाच्या काळ्या-पिवळ्या मारबतीसोबत अन्य मारबतींनीही आकर्षणात भर घातली. उत्सवावर तरुण, पुरुषांची मक्तेदारी असली तरी यंदा महिला, तरुणी, युवतींचीही लक्षणीय सहभाग होता. 

मर्द को भी दर्द होता है!
मारबत मिरवणुकीच्या इतिहासात यंदा प्रथमच पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. जेंडर इक्वेलिटी ऑर्गनायजेशनने आधुनिक तरुणीच्या वेशातील मारबत काढून पुरुष आयोग स्थापण्याची मागणी केली. ‘मर्द को भी दर्द होता है’ या फलकाद्वारे छळवणुकीमुळे प्रत्येक नवव्या मिनिटाला एक विवाहित पुरुष आत्महत्या करीत असल्याची भीषण वास्तविकता कार्यकर्त्यांनी मांडली. स्त्री पुरुषांना समान न्याय असावा, स्टॉप लिगल टेरिरीजम या मागण्या मिरवणुकीच्या निमित्ताने करण्यात आल्या. 

लाखो नागरिकांनी लुटला आनंद
केवळ विदर्भामध्ये असलेल्या मारबत, बडग्याची मिरवणुकीची धामधूम राज्याच्या सीमेपलीकडेही पोहोचली आहे. शहरातील नागरिकांसह विदर्भातील कानाकोपऱ्यातून आणि लगतच्या  मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील नागरिकही मिरवणूक पाहण्यास शहरात दाखल झाले होते. पश्‍चिम, दक्षिण-पश्‍चिम आणि दक्षिण नागपुरातील नागरिकांनी मारबत उत्सवातून पोळा पाडव्याचा आनंद घेतला. लाखांवर नागरिक उत्सवात सहभागी झाले होते.

कडेकोट बंदोबस्त
पोळ्याच्या पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध भागांत गस्त कमी न होऊ देता पोलिसांनी मारबत, बडगा उत्सवासाठी विशेष बंदोबस्त लावला होता. त्यामुळे जागनाथ बुधवारी, नेहरू  पुतळा ते नाईकतलावापर्यंत नागरिकांना मारबत उत्सवाचा निखळ आनंद लुटता आला. 

क्षणचित्रे 
 यंदा काहीशा विलंबाने मिरवणुकीला सुरुवात झाली.
 चौकाचौकांमध्ये पिवळ्या व काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी नागरिक न थकता तीन ते चार तास उभे होते.
 शहीद चौकात पिवळी व काळ्या मारबतीच्या भेटीप्रसंगी अलोट गर्दी झाल्याने हा सोहळा सर्वाधिक नयनरम्य ठरला.
 लहान मुलांना मारबतींच्या मांडीवर बसविण्याची प्रथा आहे. ती पूर्ण करताना पालकांची दमछाक झाली.
 केबलच्या जाळ्यामुळे उंच बडगे आणि मारबती पुढे जाण्यात अडथळा आला. कार्यकर्त्यांना परिश्रमपूर्वक अडथडे दूर करावे लागले.
 यंदा डीजे बंदीचा इफेक्‍ट स्पष्ट जाणवला. ढोल-ताशा, संदल, बॅंजोच्या तालावरच अनेकांनी नाचण्याची हौस भागवून घेतली.
 सिलिंडर १ हजार रुपये झालेच पाहिजे, पेट्रोलचीही दरवाढ करा, अशी उपरोधिक मागणी करीत एका मंडळाने लक्ष वेधले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marbat Rally Ram kadam Nirav Modi Narendra Modi Badagya