वाजत-गाजत वरात निघाली... पण नवरदेवाच्या भूमिकेत होते कोण?

god ganesha
god ganesha

भंडारा : दोन्ही घरात लगीनघाई. मांडव पडला. मेंदी, हळदीचा कार्यक्रमानंतर सीमांतपूजनही पार पडले. वसंत पंचमीचे औचित्य साधून विवाह सोहळ्याचा दिवस उजाडला. बहिरंगेश्‍वर मंदिरातून रथावर वर-वधूची वरातही निघाली. ढोलताशांच्या गजरात वृद्धांसह, महिला, युवकांनी ताल धरला. साडेदहा वाजता सनई चौघड्याच्या स्वरात शुभमंगल सावधानच्या गजरात विवाहसोहळा उरकला. निमित्त होते गणपती बाप्पाच्या लग्नाचे. वऱ्हाडांच्या उपस्थितीत पार पडलेला हा विवाह भंडारावासींसाठी अनोखाच अनुभव होता.
 
शहरातील वेलकम कॉलनीतील सिद्ध चिंतामणी मंदिराच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्त विश्‍वस्त मंडळातर्फे 26 जानेवारीपासून ब्रम्होत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात यावर्षी गणपती बाप्पाचा विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. विविध कार्यक्रमातच गणपती बाप्पाच्या विवाह सोहळ्याची तयारीही सुरू झाली. वर गणपती व वधू रिद्धी-सिद्धी यांचे पालकत्व स्वीकारल्यांच्या घरी मांडव पडले. हळदीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

मेंदी, हळद, सीमांतपूजन, वाजतगाजत निघाली वरात
बुधवारी (ता. 29) रात्रीच्या सुमारास मंत्रोपचारात सिमंतीपूजन झाले. आज, सकाळपासून गणपती बाप्पाच्या लग्नाची सर्वत्र धूमधाम सुरू होती. गणेश मंदिर असलेले पटांगण विवाहसोहळ्यासाठी सजलेले होते. बहिरंगेश्‍वर मंदिरातून मंगलमूर्ती गणेश व लक्ष्मीस्वरूपिणी रिद्धी-सिद्धीची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती ढोलताशांच्या गजरात वरात निघाली. वरात पोहोचताच मधूपर्क पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

उत्सवमूर्ती विवाहस्थळी पोहोचताच मंगलमूर्ती गणेश व लक्ष्मीस्वरूपिणी रिद्धी-सिद्धीची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्तीच्या मध्यभागी आंतरपाट धरण्यात आला. वऱ्हाड्यांना अक्षता वाटून मंगलकाष्टकांना सुरूवात झाली. शुभमंगल सावधान म्हणताच देवाच्या डोक्‍यावर अक्षता टाकत हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. यानंतर सुलग्नाचा कार्यक्रम पार पडला. 33 जोडप्यांचे पूजन करून ब्रह्मभोज देण्यात आला.

यावेळी मंगलमूर्ती गणेशजीचे पालकत्वाची जबाबदार माधव रामेकर यांनी पार पाडली. तर, लक्ष्मीस्वरूपिणी रिद्धी-सिद्धी  यांच्या पालकत्वाची जबाबदारी नितीन काकडे व चैतन्येश्‍वर निखाडे यांनी स्वीकारत कन्यादानाचे सोपस्कार पार पडले. सायंकाळी रिद्धी-सिद्धीसहीत मंगलमूर्तीची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. यानंतर श्रद्धापेठ येथील माधव रामेकर यांच्या घरी शोभायात्रा संपवून विवाह सोहळ्याची सांगता करण्यात आली.

विहीण पंगतीचे आकर्षण
विवाह सोहळ्यात विहिणीची पंगत आकर्षण असते. गणपती बाप्पाच्या उत्सवमूर्तीचे विवाह असतांना मंदिर समितीने विहीण पंगत ठेवून सर्वांनाच आगळावेगळा उपक्रम दाखवून दिला. यावेळी पाठवणीची वरात काढून विवाह सोहळ्यातील सर्व विधी पार पडल्या. सिद्ध चिंतामणी मंदिर उत्सव समितीने गणपती बाप्पाचा विवाह सोहळा शहरवासींसाठी आगळावेगळा असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com