esakal | ना घोडा, ना वरात..हाती फक्त दोन तास; लग्न मात्र जोमात; नियमांमुळे अडचणी

बोलून बातमी शोधा

ना घोडा, ना वरात..हाती फक्त दोन तास; लग्न मात्र जोमात; नियमांमुळे अडचणी
ना घोडा, ना वरात..हाती फक्त दोन तास; लग्न मात्र जोमात; नियमांमुळे अडचणी
sakal_logo
By
बादल वानकर

समुद्रपूर (जि. वर्धा) : जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नवीन नियमांमध्ये लग्नसमारंभाला केवळ 25 जणांना उपस्थित राहता येणार आहे. ना घोडा, ना वरात अवघ्या दोन तासांत सर्व विधी आटोपून लग्न समारंभ पार पाडावा लागणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नवीन नियमांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगतांना दिसत आहे.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तोतया बँक अधिकाऱ्यांचा धुमाकूळ; गोपनीय माहिती दिल्यास व्हाल कंगाल

लग्न म्हटले की, वऱ्हाडींसह रुसवे, फुगणे, नवरी व नवऱ्याचा मेकअप, नवऱ्या मुलाच्या आईची सरबसर, लग्नाच्या वेळी पुरोहिताच्या मामांच्या नावाने होणारा शंख, करवल्याची धावाधाव, वाद्याचे मधुर सूर अन्‌ नाचनाऱ्यायाची भाऊगर्दी या सर्वाना नवीन नियमांमुळे फाटा दिला जाणार आहे. अवघ्या दोन तासांत व 25 माणसांच्या उपस्थितीत करावयाच्या लग्न समारंभासाठी वधू - वरांच्या पालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजारांचा दंडाचा भरणा कोणी करावयाचा हे सुद्धा आता लग्नाच्या बोलाचालीत ठरवावे लागणार आहे. ना घोडा-ना वरात अशा होणाऱ्या या नवीन लग्नासाठी विधी व जेवणाकरिता वेळ कसा काढायचा? कोणते विधी किती मिनिटांत करावयाचे याची कसरत वधू-वरांच्या पालकांसह पुरोहितांना करावी लागणार आहे.

फोटो सेशनसाठीही आता पोज देण्यासाठी वधू-वरांना वेळ मिळणार नाही. बाबा लगीनची धून वाजेपर्यत दोन तास कसे निघून जाणार हे कळणार नाही. झट मंगनी पट ब्याह ही म्हण नवीन नियमांमुळे आणखी रूढ होणार आहे. क्रिकेटच्या 20-20 सामन्याप्रमाणे लग्नाचे सोपस्कार पार पाडताना प्रत्येक मिनिट वाया जाणार नाही. याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

इव्हेन्ट मॅनेजमेंटसह इतरांना नवीन नियमांमुळे व्यवसायाचे स्वरूप बदलावे लागणार आहे. मंगल कार्यालय चालकांना दोन तासांच्या विवाहामुळे एकीकडे धंदा वाढण्याची शक्‍यता असतानाच दुसरीकडे अनेकजण मंगल कार्यालयाऐवजी छोटा हॉल अथवा ज्यांचे घर मोठे आहे. तेथेच विवाह करतील.

हेही वाचा: नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा 'गेम' करण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

विवाह लांबणार

कोरोना व लॉकडाउनमुळे अनेक विवाह इच्छुक वधू-वरांचे विवाह लांबले आहेत. कोरोना व दोन तासांच्या विवाहाच्या अटीमुळे अनेक जण विवाह लांबविण्याची शक्‍यता असल्याने मंगल कार्यालय चालकांना गतवर्षी प्रमाणेच हे वर्षही अडचणीचे जाणार आहे.

नवीन नियमांमुळे अनेकांनी मंगल कार्यालयाची बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मंगल कार्यालय चालकांवर मोठा परिणाम होणार आहे. गत वर्षभरापासून लाइट बिल, माणसाचे पगार हा खर्च घरातून करावा लागत असल्याने मंगल कार्यालय चालक अडचणीत सापडले आहे.
प्रवीण तेलतुबंडे, मंगल कार्यालय संचालक, समुद्रपूर

संपादन - अथर्व महांकाळ