पवनीतही कोशिश! मूकबधिर जोडप्याचा आंतरजातीय आदर्श विवाह

नीतेश बावनकर
शुक्रवार, 29 मे 2020

दोघेही समदु:खी असल्याने जातीबंधनाचा विचार न करता दोन्ही कुटुंबीयांनी शारदा व नीकेश विवाह निश्‍चित केला. मागच्याच महिन्यात लग्नाची तारीख होती. परंतु, लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आली. आज मोजक्‍या पाहुण्यांच्या उपस्थितित सामाजिक अंतर पाळून नीकेश व शारदा विवाहबद्ध झाले.

पवनी(जि.भंडारा) : जया बच्चन आणि संजीव कुमारच्या सदाबहार अभिनयाने बहरलेला कोशिश चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. या चित्रपटात नायक-नायिका दोघेही मूकबधिर असतात. त्या दोघांचे लग्न होते आणि दोघेही आपल्यातल्या या शारीरिक वैगुण्यावर मात करीत सुखाने संसार करतात. पवनीतल्या  विवाहाने या चित्रपटाचे कथानक डोळ्यापुढे उभे राहिले कारण विवाह करणारे हे दोघेही मूकबधिर आहेत.
शहरातील शनिवारी वॉर्ड येथील शारदा बावनकर आणि निकेश मुरकुटे(भिसी)या मूकबधिर दाम्पत्याचा विवाह आज संपन्न झाला. मूकबधिर असलेल्यांचे लग्न जुळणे म्हणजे समस्याच. परंतु, भिन्न जातीचे असूनही सामाजिक आदर्श ठेवत दोघाही मूकबधिरांनी एकमेकांना स्वीकारले. यावेळी शारदाच्या डोळ्यातले आनंदाश्रू मुक्‍या भावनांना वाट करून देत होते.
आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा, सुखी संसाराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार व्हावे, अशी प्रत्येक तरुणीची स्त्रीसुलभ भावना असते. परंतु एखादे व्यंग असले तर मुलीसाठी सुयोग्य वर शोधताना पालकांच्या नाकीनऊ येते. येथील मनीरामजी बावनकर यांना सुद्धा मूकबधिर असलेल्या शारदाच्या लग्नाची काळजी होती. तिला तिच्या अनुरूप जोडीदार मिळेल की नाही, याची चिंता होती. परंतु, निकेशच्या रूपाने ती दूर झाली. शारदाचे वडील हे शेतकरी असून त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. एकीचे लग्न झाले. शारदा ही जन्मापासून मूकबधीर असल्याने तिची काळजी अधिक होती. मोठी मुलगी ही भिसी येथे राहते. तिच्या माध्यमातून नीकेशबद्दल समजले. नीकेश मुरकुटे हा होतकरू असून शेती व जोडधंदा म्हणून भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. शारदा ही मूकबधीर असली तरी घरकाम व शेतीकाम करण्यात निपुण आहे. दोघेही समदु:खी असल्याने जातीबंधनाचा विचार न करता दोन्ही कुटुंबीयांनी शारदा व नीकेश विवाह निश्‍चित केला. मागच्याच महिन्यात लग्नाची तारीख होती. परंतु, लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आली. आज मोजक्‍या पाहुण्यांच्या उपस्थितित सामाजिक अंतर पाळून निकेश व शारदा विवाहबद्ध झाले.

सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन
सामाजिक संदेश
लग्न जुळवताना फक्त कुंडलीच नव्हे तर एकमेकांची मनेही जुळणे आवश्‍यक आहे. बोलणारी व्यक्ती आपल्या भावना शब्दातून व्यक्त करते. परंतु, जे जन्मापासून मूके असतील त्यांची मने जाणून घेणे कठीणच. परंतु, कुटुंबीयांना मात्र ती कळली. जातीपातीचा विचार न करता त्यांनी या जोडप्यांचा विवाह लावून सामाजिक समतेचाही संदेश दिला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriege of deaf and dumb