Video : फडे बांधताना काटे टोचतात साहेब, पण काय करणार? पोटासाठी करावे लागते...

matang samaj
matang samaj

मोर्शी (जि. अमरावती) : फडे बांधणे हा मातंग समाजाचा पिढीजात व्यवसाय. परंतु काळाच्या ओघात हा व्यवसाय कमी होऊन बॅण्ड वाजविण्याकडे त्यांचा कल वाढू लागला. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू असल्याने लग्नसराई बंद झाली आहे. पर्यायाने बॅण्ड व्यवसायसुद्धा ठप्प झाला. मात्र उदरनिर्वाहासाठी या समाजातील नागरिक पुन्हा त्यांच्या जुन्या फडे बांधून विकण्याच्या व्यवसायाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.

मोर्शी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ पूर्वीपासून मातंगपुरा असून त्या जागेमध्ये ४० ते ५० कुटुंब राहतात. पूर्वीपासून शिंदीच्या पानापासून फडे तयार करणे तसेच लग्न व शुभप्रसंगी बॅण्ड वाजविणे हा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटुंबातील व्यक्ती गरीब असल्याने व घरी शिक्षणासाठी पोषक वातावरण नसल्याने येथील मुले पूर्णपणे शिक्षण घेऊ शकत नाही. पर्यायाने अगदी बोटावर मोजण्याइतकेच मुले नोकरीवर लागू शकले. शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही व व्यवसाय करण्याकरिता पदरी पैसे नाही.

त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता बॅण्ड वाजविण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे यातील जास्तीतजास्त युवकवर्ग बॅण्ड वाजवण्याच्या व्यवसायात जातात. परंतु देशात कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनातर्फे लग्न समारंभावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच लग्नं नसल्याने यातील काही नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

परंतु यावरही त्यांनी मात करून आपला जुना फडे तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. पूर्वी शहराच्या आजूबाजूला जंगल असल्याने गावालगतच शिंदीचे झाडे राहायची. परंतु काळानुरूप शिंदीची झाडे कमी झाल्याने व याच झाडांच्या पाणापासून फळे तयार करता येत असल्याने ही झाडे शोधण्याकरिता दूर जंगलात जावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसातच त्यांना जंगलांमध्ये ही झाडे शोधून त्या झाडांची पाने तोडावी लागतात.

तेथून या झाडांची पाने डोक्यावर आणून त्यापासून फडे तयार करावी लागतात. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असून त्या मानाने उत्पन्न कमी असल्याचे मातंग समाजबांधवांनी सांगितले. या व्यवसायामध्ये महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. पूर्वी प्रत्येक घरामध्ये फडा हा असायचाच. दिवाळी, लग्नसमारंभ किंवा शुभकार्य असल्यास हमखास ङ्कडा विकत घेतला जायचा. परंतु काळाच्या ओघात या फड्याची जागा केरसुनीने घेतलेली आहे. त्यामुळे या व्यवसायावरसुद्धा अवकळा पसरली आहे. त्यातच फडा तयार करण्याचा व्यवसाय कमी प्रमाणात असल्याने शहरात फडा मिळत नाही, तर आधुनिक काळातील झाडणी कींवा केरसुनी कोणत्याही स्टेशनरी दुकानात सहज मिळत असल्याने महिलासुद्धा या केरसुनीला पसंती देतात.

या व्यवसायाला मोठी बाजारपेठ नसली तरी सध्याच्या घडीला कमी प्रमाणात का होईना फडे तयार करून तो विकण्याचा व्यवसाय या समाजातील काही युवक करत असून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत.

बाजारपेठ मिळवून द्यावी
फळ्याला बाजारपेठ नसल्याने गावात फिरून अत्यल्प रक्कम पदरी पडत असल्याची खंत व्यवसाय करणा-यांनी बोलून दाखविली. यासाठी शासनातफे बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे, असे सुखदेव तायवाडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com