esakal | मेळघाटात पुन्हा मातामृत्यूची नोंद; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

मेळघाटात पुन्हा मातामृत्यूची नोंद; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

मेळघाटात पुन्हा मातामृत्यूची नोंद; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटातील महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना घडली. या मातेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप पतीने केला आहे. याबाबतची तक्रार धारणी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, या घटनेने मेळघाटात पुन्हा मातामृत्यूची नोंद झाली आहे. (maternal-death-Melghat-Doctor's-negligence-Amravati-crime-news-Amravati-news-nad86)

धारणी तालुक्यातील साद्रावाडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या दांभिया गावातील रंजना मधू हेकडे ही महिला दुसऱ्या बाळंतपणासाठी आईच्या गावाला गेली होती. तिथे तिला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर घरच्यांनी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उतावली येथील सुशीला नायर रुग्णालयात रेफर केले आणि त्याठिकाणी रंजनाचे सीझर करण्यात आले. यावेळी महिलेने एका मुलीला जन्म दिला. मात्र, रंजनाची प्रकृती दुसऱ्या दिवशी अचानक बिघडली. त्यामुळे तिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखल करून उपचारास सुरवात केली. मात्र, महिलेची प्रकृती चिंताजनक होत गेली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अमरावतीच्या डफरिन रुग्णालयात पाठविले, परंतु तेथूनही तिला इर्विन रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी रंजनाला मृत घोषित केले.

सदर महिलेची शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. त्यात कोणताही हलगर्जीपणा झाला नाही. महिलेचा ताप कमी होत नसल्याने रक्ताची तपासणी केली व तिला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सरकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे.
- मनोज कानडे, प्रशासकीय अधिकारी, सुशीला नायर हॉस्पिटल, उतावली

हेही वाचा: वाचवा, वाचवाऽऽ मला मरायचे नाही; नामफलकाला लावला गळफास

सुशीला नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने सीझर करून पत्नीची हत्या केली आहे. त्यामुळे डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व माझ्या पत्नीला न्याय द्यावा.
- मधू हेकडे, मृत महिलेचा पती
सदर महिला रॅपिड तपासणीत डेंग्यू पॉझिटिव्ह आली होती. त्यानुसार गावात तपासणी केली. मात्र, गावात काही आढळून आले नाही. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर नेमके कारण कळू शकेल.
- शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी

(maternal-death-Melghat-Doctor's-negligence-Amravati-crime-news-Amravati-news-nad86)

loading image