कॅन्सरवर रामबाण! बहुगुणी औषधी कटुले मिळतात केवळ चार आठवडे

रवी कलाने
Thursday, 6 August 2020

ग्रामीण भागात शेतशिवारात अल्पप्रमाणात कटुल्याचे वेल सापडतात.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कटुले विक्रीसाठी येऊ लागले आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर जंगलात तसेच माळरानावर किंवा शेताच्या धुऱ्यांवर कटुल्याच्या वेलाची उगवण होत असते. हा रानमेवा तसेच औषधी भाजीपाला म्हणून देखील ओळखला जातो.

मालखेडरेल्वे (जि. अमरावती) ः दिवसेंदिवस नामशेष होत चाललेल्या रानभाज्यांचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. पावसाळ्यात या रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उगवतात. कॅन्सरसारख्या आजारावर बहुगुणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच रानमेवा म्हणून परिचित असलेल्या वन्यऔषधी भाजीपैकी एक असलेले कटुले सध्या बाजारात येत असून त्यास जवळपास २०० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळू लागला आहे.

ग्रामीण भागात शेतशिवारात अल्पप्रमाणात कटुल्याचे वेल सापडतात.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कटुले विक्रीसाठी येऊ लागले आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर जंगलात तसेच माळरानावर किंवा शेताच्या धुऱ्यांवर कटुल्याच्या वेलाची उगवण होत असते. हा रानमेवा तसेच औषधी भाजीपाला म्हणून देखील ओळखला जातो. कॅन्सरवर औषधी म्हणून देखील कटुल्याचा उपयोग केला जातो. कटुल्यामध्ये ल्युटेनसह अनेक कॅन्सरविरोधी तत्त्वे असतात. कॅन्सर बरोबर हृदय व डोळ्यांसंबंधित आजारही कटुल्यकंमुळे दूर होतात. कटुले खाल्ल्याने कोणत्याच प्रकारचा कॅन्सर होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच आम्लपितावर रामबाण उपाय म्हणून कटुल्याचे सेवन केले जाते.

शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असले तर याचे सेवन केल्याने शरीराची उष्णता कमी होत असल्याचे गावातील जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. कटुले ही एक महत्त्वपूर्ण रानभाजी असून तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. सध्या तणनाशकाच्या अती वापरामुळे पावसाळ्यात आढळणाऱ्या बहुगुणी रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत.

रंगाने हिरवट आणि आकाराने छोटेसे, थोडेसे काटेरी असणारे कटुले बहुगुणकारी असून याची खूप मागणी आहे. कटुले केवळ चार आठवड्यांपर्यंतच झाडावर आढळतात.

कटुले बहुगुणी असले तरी ते सध्या कुठे दिसत नाही. त्याचे उत्पन्न केवळ ग्रामीण भागात होते. कारण कटुले डोंगरावर येणारी रानभाजी आहे. तसेच कटुल्याच्या बियांची उगवणक्षमता दोन टक्‍के असल्याने कंदाची लागवड केल्याशिवाय त्यांची निर्मिती होत नाही. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये कटुले पाहायला मिळत नाहीत.

सर्वांत पोषक बहुगुणी भाजी
कटुल्याची भाजी ही सर्वांत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते. शिवाय भाजीला जागतिक स्तरावर देखील एक वेगळे महत्त्व आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात कटुल्याचे उत्पादन हे नेहमीच होते. पण शहरवासीयांना ही भाजी खाण्यासाठी ती बाजारातूनच खरेदी करावी लागते. सध्या कोरोनाची परिस्थिती बघता शहरात कटुले फार कमी पाहायला मिळत आहेत.
 
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medicinal vegetable in rainy season