Gadchiroli News : मेडीगड्डा धरणाच्या पुलाचा पाया खचला; सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा

सिरोचा तालुक्याला धोक्याचा इशारा; २० गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता
medigadda dam bridge foundation collapsed warning of danger to Sironcha taluka gadchiroli
medigadda dam bridge foundation collapsed warning of danger to Sironcha taluka gadchiroliSakal

गडचिरोली : तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सीमेवर उभारलेल्या वादग्रस्त मेडीगड्डा धरणाच्या पुलाचा पाया खचल्याने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याच्या २० गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने पुराचा धोका निर्माण झाला असून या मार्गावरील रहदारीदेखील रात्रीपासून बंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून मेडीगड्डा धरण उभारण्यात आले. दरवर्षी या धरणातील पाण्यामुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान होते. दरम्यान, शनिवार (ता. २१) रात्री उशिरा अचानक मेडीगड्डा धरणावरील महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाचे २०, २१ व २२ क्रमांकाचे खांब खचले.

त्यामुळे सायरनद्वारे सूचना देऊन दोन्ही बाजूंनी रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला. त्यानंतर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सिंचन विभागाचे तज्ज्ञ अभियंता व वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत, सध्या युद्धपातळीवर दुरुस्तीकाम सुरू आहे.

परंतु अचानक पाणी सोडल्याने आसरअल्ली, सोमनूर संगम, टेकडामोटला अशा १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नदीकाठी सिंचनासाठी विद्युतपंप, पाइप, वायर या पाण्यात वाहून गेले. मिरची, कापूस उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

नागरिकांना दक्षतेचे आवाहन...

यासंदर्भात सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे म्हणाले की, शनिवारी रात्री पुलाचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने रहदारी बंद करण्यात आली आहे. तेथे सिंचन विभागाकडून दुरुस्तीकाम सुरू आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आता हे पाप कुणाचे ?

कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द करताना सध्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटीकरणाचे पाप पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारचे आहे, असे सांगितले. तोच धागा पकडत सध्या भाजप सर्वत्र महाविकास आघाडीवर कंत्राटीकरणावरून टीका करत निषेध कार्यक्रम करत आहे.

पण तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा धरणाला हिरवी झेंडी दाखवणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. हे धरण सिरोंचा तालुक्यासाठी कर्दनकाळ ठरले आहे. हे धरण झाल्यापासून येथे पुराचे प्रमाण वाढले आहे. त्यात दरवर्षी शेती वाहून जात आहे. एकेकाळचा समृद्ध आणि धान, कापूस, मिरचीसाठी प्रसिद्ध हा तालुका देशोधडीस लागला आहे. मग हे पाप कुणाचे, असा प्रश्न सिरोंचावासी विचारत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com