मेळघाट अद्याप सरासरीपासून दूर, काय आहे नेमके प्रकरण. वाचा...

सुरेंद्र चापोरकर
Friday, 14 August 2020

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आघाडी घेतली आहे. १ जुने ते १३ ऑगस्ट या कालावधीत तो जिल्ह्यात सरासरी ९६ टक्के झाला असला तरी सर्वाधिक पावसाच्या क्षेत्रातील मेळघाटातील दोन्ही तालुक्‍यात अद्याप त्याने सरासरी गाठली नाही.

अमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आघाडी घेतली आहे. १ जुने ते १३ ऑगस्ट या कालावधीत तो जिल्ह्यात सरासरी ९६ टक्के झाला असला तरी सर्वाधिक पावसाच्या क्षेत्रातील मेळघाटातील दोन्ही तालुक्‍यात अद्याप त्याने सरासरी गाठली नाही. याशिवाय तीन तालुक्‍यांमध्येही सरासरी इतका झाला नाही. दर्यापूर, चांदूर बाजार व अंजनगावसुर्जी या तालुक्‍यात पावसाची सरासरी सर्वाधिक आहे.

जून व जुलै या दोन महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाची सरासरी सर्वाधिक आहे. अडीच महिन्यातील या पावसाने नदी नाल्यांसह धरणातील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अप्परवर्धा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्‍यता आहे. तर, पूर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. लघू प्रकल्पांनी उच्चतम पातळी गाठली असून चारघडसारखे लघू प्रकल्प आव्हरफ्लो झाली आहेत. १ जून ते १३ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ५२३ मिमि पाऊस झाला असून सरासरीने तो ९६ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत तो ५०३ मिमि व ९२ टक्के होता.

वाचा - चिंब पावसानं … आबादानी ! ४६ मिलिमीटर बरसला, आणखी दोन-तीन दिवस जोरदार

यंदा जून व जुलै या दोन महिन्यात दर्यापूर, चांदूर बाजार, अंजनगावसुर्जी, मोर्शी, वरूड व भातकुली या तालुक्‍यात पावसाची सरासरी सर्वाधिक राहिली आहे. तर मेळघाटातील दोन्ही तालुक्‍यात तो सरासरीही गाठू शकलेला नाही.
जून ते सप्टेंबर या पावसाच्या चार महिन्यात जिल्ह्यात ७९२ मिमि पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत तो ६६ टक्के झाला आहे. अडीच महिन्यातील पावसाची वाटचाल समाधानकारक असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार आहे. अद्याप दीड महिना शिल्लक असल्याने ती अपेक्षा पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ६१ मिमि पाऊस झाला आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Melghat is still away from Average RainFall