क्रूरतेचा कळस! डिवचले म्हणून डोक्यावर लाकडी ठोकळ्यानं केले वार; परतवाडामधील धक्कादायक प्रकार 

प्रकाश गुळसुंदरे
Thursday, 18 February 2021

धीरज ऊर्फ प्रज्वल राजेश जावरकर (वय 25) व निखिल अरुण सोनार (वय 30, दोन्ही रा. कविठा), अशी संशयित आरोपींची नाव असल्याचे परतवाडा पोलिसांनी सांगितले.

परतवाडा (जि. अमरावती) : अचलपूर तालुक्‍यातील कविठा गावामध्ये डिवचल्याच्या कारणाने विजय जाधव याला दोघांनी लाकडी ठोकळ्याने मारून ठार केल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणात अटकेतील दोन संशयितांनी हत्येची कबुली पोलिसांपुढे दिली.

हेही वाचा - वर्ध्यात जमावबंदी लागू, ५ पेक्षा अधिकजण एका ठिकाणी जमल्यास होणार कारवाई

धीरज ऊर्फ प्रज्वल राजेश जावरकर (वय 25) व निखिल अरुण सोनार (वय 30, दोन्ही रा. कविठा), अशी संशयित आरोपींची नाव असल्याचे परतवाडा पोलिसांनी सांगितले. तालुक्‍यातील कविठा गावामध्ये मंगळवारी (ता. 16) विजय जाधव याचा मृतदेह आढळला होता. विजयची हत्या की अपघात, याबाबत बऱ्याच वेळेपर्यंत संभ्रमावस्था होती. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता विजय जाधव याच्यावर लाकडी फळीने वार करून त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

सोमवारी (ता. 15) रात्री विजयने दोन्ही संशयित आरोपींना डिवचण्याचे काम केले. त्याचा राग आल्यामुळे धीरज व निखिल या दोघांनीही विजय जाधव याला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेले व तेथे वाद घालून विजयला ठार केल्याचे त्या दोघांनी तपास अधिकाऱ्यांपुढे स्पष्ट केले.

हेही वाचा - अंकीता जळीतकांड : शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांसह १६ जणांची साक्ष, पुढील सुनावणी २० मार्चला

 परतवाडा पोलिसांनी धीरज व निखिल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. परतवाड्याचे पोलिस निरीक्षक सदानंद मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. अचलपूर न्यायालयाने दोघांनाही शनिवार (ता. 20) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men attack on man in Paratwada Amravati