esakal | मतदान सुरु असताना झाला वाद आणि युवकांनी फाडली पोलिसांची वर्दी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

Men tear uniforms of police in Chandrapur

तालुक्‍यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्ह्यातून पोलिस कुमक बोलावण्यात आली होती. मोठेगाव येथे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात दोन गटात बाचाबाची सुरू असताना जमाव गोळा झाला. 

मतदान सुरु असताना झाला वाद आणि युवकांनी फाडली पोलिसांची वर्दी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना 

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील नेरी पोलिस दुरक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या मोठेगाव येथे मतदानादरम्यान सकाळी 10 वाजता दोन गटात वादावादी झाली. हे सोडवायला गेलेल्या पोलिसांसोबत हाणामारी करून गणवेश फाडणाऱ्या मयूर पुरुषोत्तम दडमल, भगवान गुप्तराज रामटेके, रवी गणुजी खोब्रागडे यांना अटक करण्यात आली होती. विशाल अरुण राजूरकर यांच्या तक्रानंतर हाणामारी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तालुक्‍यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्ह्यातून पोलिस कुमक बोलावण्यात आली होती. मोठेगाव येथे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात दोन गटात बाचाबाची सुरू असताना जमाव गोळा झाला. या निषिद्ध क्षेत्राच्या बाहेर जाण्यास सांगण्यासाठी गेलेल्या व सेक्‍टर 29 मध्ये पेट्रोलिंग ड्यूटीवर असलेला जिवती तालुक्‍यातील भारी येथील पोलिस कर्मचारी विशाल अरुण राजूरकर यांना मोठेगाव येथील मयूर पुरुषोत्तम दडमल (वय 30), भगवान गुप्तराज रामटेके (वय 37), रवी गणुजी खोब्रागडे (वय 31) या तिघांनी जमावामधुन आक्रमकपणे पुढे येऊन हाथाबुक्‍यांनी मारहाण करून बॅच खेचून गणवेश फाडला.

अधिक वाचा - बापरे! जीवंत रुग्णाचे पाय पोहोचले थेट शवागारात अन् सत्य समोर येताच उडाली तारांबळ   

यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात दंगा नियंत्रक पथक तथा राज्य सुरक्षा दल दाखल झाले. पोलिसांची कुमक पाहून वातावरण शांत झाले.

जमावातून आक्रमक पणे पुढे येऊन पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. या घटनेची तक्रार चिमूर पोलिस ठाण्यात विशाल राजूरकर यांनी केली. त्यानंतर या तिघांविरोधात भादंवि 353, 332, 504 व 186 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला. चिमूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तिघांना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

गुन्हेगारांना नोटीस

चिमूर तालुक्‍यात मतदानादरम्यान मोठेगाव येथे झालेल्या घटनेचा धडा घेऊन मतदान मोजणी दरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता चिमूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील उपद्रवी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात प्रतिबंध कायद्याअंतर्गत नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे .

संपादन - अथर्व महांकाळ