मेळघाटवर स्थलांतराचे काळे ढग; स्थानिक स्तरावर रोजगाराचा अभाव

सुधीर भारती 
Tuesday, 17 November 2020

येथील मजूर मराठवाड्यासह चेन्नई, बंगळूर, कर्नाटक आदी राज्यांमध्ये कामासाठी जात असतात. कोरोना लॉकडाउनपुर्वीसुद्धा मेळघाटातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते.

अमरावती ः दिवाळी संपताना आता मेळघाटात मजुरांच्या स्थलांतराची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे स्थलांतर केल्यामुळे कुटुंबातील चिमुकल्या मुलामुलींना पोषणाहारसुद्धा उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी कुपोषणाची आकडेवारी वाढत जाते.

येथील मजूर मराठवाड्यासह चेन्नई, बंगळूर, कर्नाटक आदी राज्यांमध्ये कामासाठी जात असतात. कोरोना लॉकडाउनपुर्वीसुद्धा मेळघाटातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते. मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्याने स्थानिक आदिवासी गावातच राहिले. मात्र आता आदिवासीबांधवांची पाच दिवसांची दिवाळी संपताच अनेक कुटुंबांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. 

सविस्तर वाचा - बापरे! धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्याला सापडले सोने; लक्ष्मीपूजनाला तीन गावात दवंडी देऊन केले परत

मागील वर्षी मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्‍यातील बहुतांश गावे रिकामी झाली होती. यावर्षीसुद्धा आता दिवाळीनंतर स्थलांतराला वेग येणार आहे. मेळघाटात अद्यापही मजुरांना स्थानिक स्तरावर कामे उपलब्ध करून देण्यास सरकारी यंत्रणा सक्षम झालेली नाही. शासनाच्या बहुतांश योजनांचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचत नसल्याची ओरड सुरू आहे. अशा परिस्थितीत आता कामासाठी मेळघाटात स्थलांतराचे वारे वाहू लागले आहे.

वीटाभट्ट्यांवर काम

दरवर्षी मेळघाटातून हजारो कुटुंबे रोजगारासाठी अन्य जिल्ह्यात तसेच परप्रांतात जात असतात. त्यांच्यासोबत चिमुकली मुलेसुद्धा जातात. पर्यायाने अंगणवाड्यांमधूून मिळणारा पोषणाहार बंद होतो. बहुतांश मजूर हे वीट भट्ट्यांवर आपल्या कुटुंबासह काम करतात. त्यामुळे कुपोषणात वाढ होण्याची शक्‍यता आहे.\

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

शासनाने मेळघाटातच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करून रोजगार देण्याची गरज आहे. तरच मजुरांचे स्थलांतर रोखले जाऊ शकते.
-ऍड. बंडू साने, 
खोज संस्थापक.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration is going from Melghat as there are no jobs