निवडणूक जिंकताच उमेदवाराचा दुधाने अभिषेक, अख्ख्या पंचक्रोशीत रंगली चर्चा

गणेश राऊत
Wednesday, 20 January 2021

धनज (माणिकवाडा) हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध गाव आहे. येथे फकिरजी महाराज यांचे मंदिर आहे. फकिरजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश या गावातूनच दिला आहे. हिंदू-मुस्लिम असा भेद या गावात कधी पाळला जात नाही.

नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गंमती-जमती बघायला मिळाल्या. तर, काही ठिकाणी चुरस आणि खुन्नसही दिसली. मात्र, तालुक्‍यातील धनज येथे प्रथम सत्तांतर होताच विजयी उमेदवाराचा चक्क दुधाने अभिषेक करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकच केलेला जल्लोष हा अख्ख्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा

तालुक्‍यातील धनज (माणिकवाडा) हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध गाव आहे. येथे फकिरजी महाराज यांचे मंदिर आहे. फकिरजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश या गावातूनच दिला आहे. हिंदू-मुस्लिम असा भेद या गावात कधी पाळला जात नाही. दोन्ही समाज सण-उत्सव मोठ्या उत्साहात एकत्रितपणे साजरा करतात. येथे लेकींना माहेरी बोलावून पुरण-पोळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. धनज हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस कार्यकर्ते सुरेश सहारे यांनी आजपर्यंत हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला होता. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेने अनेकदा प्रयत्न केले. परंतु, ते सर्व असफल ठरले. मात्र, अलीकडच्या काळात पालकमंत्री संजय राठोड यांनी धनज देवस्थान व पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे धनज येथे सत्तापरिवर्तन झाले असे समजले जाते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज नाल्हे यांनी या निवडणुकीवर विशेष लक्ष दिले.

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सर्व जाती धर्माच्या तरुणांनी सुरुंग लावत उद्‌ध्वस्त केले. धनज ग्रामपंचायतीतील सर्व नऊ जागांवर शिवसेना समर्थित पॅनलला विजय मिळाला. प्रथमच येथे भगवा फडकवला आहे. वॉर्ड क्रमांक एक हा मुस्लिमबहुल आहे. या ठिकाणी अजूनही शिवसेनेला आपली जागा करता आली नव्हती. या निवडणुकीत शिवसेना समर्थित पॅनेलने हा वॉर्ड काबीज केला आहे. गावातील दूध विक्रीचा व्यवसाय करणारे इस्राईल रसूल खा पठाण यांनी नासिर बेग मिर्झा यांच्या विजयासाठी प्रण केला होता. या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्यास त्याचा दुधाने अभिषेक करेल, अशी त्यांनी शपथ घेतली होती. या वॉर्डातील मिर्झा नासिर बेग  347 मते घेत विजयी झाले. ही वार्ता कानी पडताच नेर येथील माणिकवाडा रोडवर विजयी उमेदवाराचा दुधाने अभिषेक करून जल्लोष करून जल्लोष करण्यात आला. या घटनेने अनेकांना अभिनेता अनिल कपूर यांचा नायक हा चित्रपट आठवल्याशिवाय राहिला नाही. या चित्रपटात नायक असलेल्या अनिल कपूर यांचीही दुधाने अंघोळ केली जाते. उमेदवाराच्या या अफलातून स्वागताची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk anointing of the candidate won in gram panchayat election in ner of yavatmal