esakal | अखेर प्रश्नाचं उत्तर मिळालं! वनमंत्री संजय राठोड उद्या येणार समोर
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Sanjay rathod will present at pohradevi tomorrow

दिग्रसपासून नऊ किलोमीटर अंतरावर बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड गुरुवारी येणार अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.

अखेर प्रश्नाचं उत्तर मिळालं! वनमंत्री संजय राठोड उद्या येणार समोर

sakal_logo
By
रामदास पद्मावार

दिग्रस (जि. यवतमाळ) : वनमंत्री संजय राठोड जनता आणि माध्यमांसमोर कधी येणार, असा प्रश्‍न राज्यातील जनतेला पडला होता. वनमंत्री राठोड मंगळवारी (ता.23) दुपारी एक वाजता सहपरिवार पोहरादेवीला येणार असल्याची माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.

दिग्रसपासून नऊ किलोमीटर अंतरावर बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड गुरुवारी (ता.18) येणार अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पोहरादेवीकडे केंद्रीत झाले होते. शासकीय यंत्रणा सुद्घा सज्ज झाली. परंतु अगदी वेळेवर 18 फेब्रुवारी तारीख रद्द करण्यात आली. लगेच दोन दिवसानंतर महंत सुनील महाराज यांनी 23 फेब्रुवारीची तारीख जाहीर केली. 

हेही वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

वनमंत्री राठोड हे आपल्या परिवारासह दुपारी एक वाजता पोहरादेवीला येतील. संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज व श्री जगदंबा मातेचे दर्शन घेणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले. प्रशासकी यंत्रणेकडून किंवा राठोड यांच्या खासगी जनसंपर्क विभागाकडून पोहरादेवीला कार्यक्रम असल्याचे कुठल्याच प्रकारे जाहीर करण्यात आले नाही हे येथे उल्लेखनीय.

मानोरा पोलिस ठाण्याकडून येथील संस्थेला कलम 149 जा.फौ.प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये नोंद आहे. विशेष म्हणजे पोहरादेवी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा सभा मंडप किंवा सभागृह निश्‍चित नसल्याने राठोड हे फक्त दर्शनासाठी येतील व निघून जातील, असेही बोलले जात आहे.

हेही वाचा - भीषण! चालकाची एक चूक आणि थेट हनुमान मंदिरावर धडकली वरातीची बस; मध्यरात्रीचा धडकी भरवणारा थरार 

मुंगसाजी महाराजांचे घेणार दर्शन

दारव्हा येथे दुपारी दोन वाजता मुंगसाजी महाराजांचे दर्शन घेऊन दुपारी चारला वनमंत्री राठोड यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरानाबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यांचा अधिकृत असा दौरा देण्यात आलेला नाही.

संपादन - अथर्व महांकाळ