esakal | मृत वाघाचा ‘बेपत्ता’ झालेला पाय सापडला; दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

The missing leg of a dead tiger was found Two railway employees arrested

घटनास्थळ हे गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या पिंडकेपार मुंडीपार बिटात येत असून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोडते. मृत वाघाचे वय अंदाजे १२ ते १५ महिन्याचे असून तो नर आहे.

मृत वाघाचा ‘बेपत्ता’ झालेला पाय सापडला; दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

sakal_logo
By
मनेश्वर कुकडे

गोंदिया : गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावरील पिंडकेपार-गोंगले दरम्यान रेल्वेने दिलेल्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेत त्या बछड्याचा उजवा पाय बेपत्ता होता. दरम्यान, वनविभागाने श्वानपथकाच्या मदतीने बेपत्ता पायासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

रेल्वेच्या धडकेत वाघ मृतावस्थेत व उजवा पाय कटलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती पिंडकेपार सहवनक्षेत्राचे क्षेत्र सहायक डी. एल. धुर्वे यांना रेल्वे फाटकाच्या स्वीचमॅनने दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंह, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका पूनम माटे, सहायक वनसंरक्षक आर. आर. सदगीर, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, रूपेश निंबार्ते तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मृत वाघाचे शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी - हरभऱ्याची गंजी लावून घरी परतला शेतकरी, सायंकाळी शेतात जाताच सरकली पायाखालची जमीन

घटनास्थळ हे गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या पिंडकेपार मुंडीपार बिटात येत असून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोडते. मृत वाघाचे वय अंदाजे १२ ते १५ महिन्याचे असून तो नर आहे. दरम्यान, घटनेच्या अधिक तपास करण्यासाठी वनविभागाने श्वानपथकाच्या मदतीने चक्र फिरविली असता वाघाचे पाय रेल्वे विभागात चाबीदार म्हणून कार्यरत पुरुषोत्तम काळसर्पे (रा. दांडेगाव/एकोडी) व हरीप्रसाद मीना (रा. गोंगले) यांच्याकडे असल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्याच रात्री १२.३० वजता दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून मृत वाघाचा कापलेला पाय ताब्यात घेतला आहे. पुढील तपास वन विभागातर्फे सुरू आहे.

वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गाची पूर्व दिश नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. त्यामुळे अनेकदा वन्यजीव खाद्यान्न व पाण्याच्या शोधात रेल्वे रुळ ओलांडतात. असे करताना त्यांच्या जीविताला धोका राहत असून, यापूर्वी देखील वन्यप्राण्यांचा रेल्वेगाडीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाद्वारे सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या परिसरात वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.