
आमदार भारसाकळे यांच्या स्थानिक शिवाजीनगर येथील पत्त्यावर २० फेब्रुवारी रोजी एक निनावी पत्र आले होते. पत्रातील मजकुरात आमदार भारसाकळे यांना पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास त्यांना व मुलास गोळ्या झाडून मारण्याची धमकी देण्यात आली होती.
दर्यापूर (जि. अमरावती) : येथील रहिवासी आणि अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना निनावी पत्र पाठवून पाच कोटी रुपयांची खंडणी व कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमकीप्रकरणात दर्यापूर पोलिसांनी भारसाकळे यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.
आमदार प्रकाश भारसाकळे यांना खंडणी मागण्यासोबतच कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपींमध्ये दर्यापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा शेतकरी जिनिंग-प्रेसिंगचे माजी अध्यक्ष विक्रमसिंह परिहार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम ऊर्फ मनोज तायडे आणि संदीप गावंडे यांचे नाव आहे. त्यामुळे या धमकीपत्राचे परिणाम दर्यापुरातील राजकीय क्षेत्रात उमटण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा - खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी
आमदार भारसाकळे यांच्या स्थानिक शिवाजीनगर येथील पत्त्यावर २० फेब्रुवारी रोजी एक निनावी पत्र आले होते. पत्रातील मजकुरात आमदार भारसाकळे यांना पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास त्यांना व मुलास गोळ्या झाडून मारण्याची धमकी देण्यात आली होती.
आमदार भारसाकळे यांच्या स्वीय सहायकांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई व आमदार भारसाकळे यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होती. प्रकरणी सोमवारी पोलिसांनी आमदार भारसाकळे यांचा जबाब नोंदविला. त्यांच्या जबाबावरून संशयित आरोपी विक्रमसिंह परिहार, मनोज तायडे आणि संदीप गावंडे यांच्या विरोधात सोमवारी (ता. एक) गुन्हा दाखल केला आहे.
कुणाला अटक झालेली नाही
ज्या तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांना चौकशीसाठी बोलावून बयाण नोंदविण्यात येईल. अद्याप त्यात कुणाला अटक झालेली नाही.
- प्रमेश आत्राम,
पोलिस निरीक्षक, दर्यापूर ठाणे