esakal | आमदारांनी मारला झुणका-भाकरीवर ताव
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणा ःहिंगणा शिवाजी चौकातील झुणका-भाकर केंद्रावर ताव मारताना आमदार समीर मेघे.

आमदारांनी मारला झुणका-भाकरीवर ताव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि.नागपूर) : भाजप-सेना युतीच्या काळात झुणका-भाकर केंद्र योजना सुरू होती. योजना बंद पडल्यानंतर झुणका-भाकर केंद्राचे पेव फुटले. हिंगणा शहरातील शिवाजी चौकातील एका झुणका-भाकर केंद्रावर आमदार समीर मेघे यांनी झुणका-भाकरीवर सोमवारी ताव मारला.
भोसलेवाडी निवासी बबन चव्हाण यांची पत्नी बेबी चव्हाण यांचे शिवाजी चौकातील मार्गावर झुणका-भाकर केंद्र आहे. वर्षभरापूर्वी त्यांचे झुणका-भाकर केंद्र पूर्णतः जळाले होते. उदरनिर्वाह करण्याचे एकमेव साधन असलेले झुणका-भाकर केंद्र जळाल्याने त्यांचा संसार उघड्‌यावर पडला होता. बरेच महिने झुणका-भाकर केंद्र बंद राहिले. आमदार समीर मेघे यांच्याकडे मदत मागावी, का असा विचार बेबीताईंच्या मनात आला. शेवटी हिंगणा जनसंपर्क कार्यालयातील स्वीय सहायक श्रीधर भडंग यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. झुणका-भाकर केंद्र जळाल्याची माहिती आमदार समीर मेघे यांना देण्यात आली. पुन्हा नव्याने केंद्र सुरू व्हावे, यासाठी आमदारांनी दहा हजारांची मदत केली. या मदतीच्या भरोशावर त्यांनी पुन्हा झुणका-भाकर केंद्र सुरू केले. यामुळे बंद झालेला रोजगार पुन्हा त्यांना मिळाला. सोमवारी त्यांचा हिंगणा तालुक्‍यात दौरा होता. गणेश चतुर्थी असल्याने भोजन झाले नव्हते. त्यांना अचानक बेबी चव्हाण यांच्या झुणका-भाकर केंद्राची आठवण झाली. त्यांच्या झुणका-भाकर केंद्रासमोर त्यांनी गाडी उभी केली. झोपडीत असलेल्या झुणका-भाकर केंद्रात त्यांनी प्रवेश करताच बेबीताई अवाक्‌ झाल्या. ताई, खूप भूक लागली आहे, झुणका-भाकर द्या, असे त्यांनी म्हटले. आमदार महोदय आपल्या झोपडीत भाकरी खाण्यासाठी आल्याने त्यांना खूप आनंद झाला. तातडीने चुलीवर गरम गरम भाकरी तयार करून झुणका सोबत दिला. आमदार मेघेंसह त्यांच्यासोबत असलेले एक-दोन पदाधिकारी यांनीही झुणका-भाकरीवर ताव मारला. यानंतर किती पैसे झाले, असे आमदारांनी विचारले. तेव्हा त्यांनी साहेब कशाचे पैसे, तुम्ही आलात हेच खूप झाले असे म्हणाल्या. तुमच्या मदतीमुळे माझे जळालेले झुणका-भाकर केंद्र पुन्हा सुरू झाले साहेब, असे तिने सांगितले. शेवटी आमदार महोदयांनी 501 रुपये त्यांच्या हातात ठेवले. यानंतर गाडीत बसून पुढील दौऱ्यासाठी ते रवाना झाले. हा प्रसंग आटोपल्यानंतर बेबीताईंच्या डोळ्यात अश्रू आले. गरिबांची मदत करून संसार उभा करणारा आमदार नव्हे, तर आमचा पाठीराखा आहे असे बेबीताईंनी संबोधले.
 

loading image
go to top