Vidhan Sabha 2019 : जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

केंद्रीय कायदामंत्री सांगत आहेत, की तीन चित्रपट चालले असून देशात मंदी नाही. तर, मग उद्योगधंदे बंद होत असताना त्याला मंदी म्हणायची नाही का? सत्ताधारी महाराष्ट्र उभा करू शकत नाहीत. अनेक उद्योग बंद झाले, नोकऱ्या गेल्या. सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत, की 30 टक्के सरकारी कर्मचारी काढून टाकले जाणार आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनाही नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.

वणी : महाराष्ट्राला आज सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे मला विरोधीपक्षाची भूमिका देऊन पाहा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

यवतमाळमधील वणी येथे राज ठाकरे यांची आज (सोमवार) दुपारी सभा झाली. राजू उंबरकर यांच्या प्रचारासाठी ते येथे आले होते.

राज ठाकरे म्हणाले, ''पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात त्यांच्या पक्षालाही उपयोग झाला नाही. त्यांच्या कारभाराचा भाजप-शिवसेना युतीला फायदा झाला. काँग्रेसच्या चुकीमुळे भाजप सत्तेत आले. आज अनेक गोष्टींची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेला जिल्हा अशी आहे. आता गेल्या पाचवर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या निवडणुकीकडे गंमत, खेळ म्हणून बघू नका, नाहीतर तुमचे प्रश्न कधीच संपणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आगोदर एका शेतकऱ्याने बुलडाण्यात भाजपचा टी शर्ट घालून आत्महत्या केली. गेल्या पाच वर्षांत सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. नोटांबदीच्या निर्णयामुळे देशावर संकट आले आहे.'' 

केंद्रीय कायदामंत्री सांगत आहेत, की तीन चित्रपट चालले असून देशात मंदी नाही. तर, मग उद्योगधंदे बंद होत असताना त्याला मंदी म्हणायची नाही का? सत्ताधारी महाराष्ट्र उभा करू शकत नाहीत. अनेक उद्योग बंद झाले, नोकऱ्या गेल्या. सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत, की 30 टक्के सरकारी कर्मचारी काढून टाकले जाणार आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनाही नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पुन्ही हीच लोकं सत्तेत येणार असतील तर वरवंटा तुमच्यावरही फिरणार. त्यामुळे आता महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. प्रत्येकाला सत्तेत जायचंय पण मला नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधीपक्षात जायचंय. मला सत्ताधारी पक्षाचा जाहीरनामा फाडायचा आहे, असे राज यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray criticize BJP government in Wani