
विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात महाराष्ट्र सैनिक सदैव आक्रमक मोडमध्ये असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मनसे राज्य उपाध्यक्ष उंबरकर पोलिसांच्या नजरकैदेत; चौघे ताब्यात
यवतमाळ-वणी - विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात महाराष्ट्र सैनिक सदैव आक्रमक मोडमध्ये असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळेच राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचेसह सात पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी 'नोटीस' बजावली असून उंबरकरांच्या निवसस्थानासमोर कडेकोट बंदोबस्त लावून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांना आवाजाची मर्यादा घालून दिली होती, ती मर्यादा त्यांनी ओलांडली. गर्दीचा नियमही त्यांनी मोडला. तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटी पैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस प्रशासन राज ठाकरे यांना केव्हाही अटक करू शकतात यामुळे महाराष्ट्र सैनिकांत अस्वस्थता पसरली आहे. राज्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाला 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे.
वणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पदाधिकाऱ्यांना दि 3 मेला कलम 149 ची नोटीस बजावली आहे. यात राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, माजी नगरसेवक धनंजय त्रिंबके,तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांचेसह अन्य तीन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.तर दि 4 मेला दुपारी 12 वाजताच्या सुमरास मनसे रुग्ण सेवा केंद्र असलेल्या कार्यालयातून माजी नगरसेवक धनंजय त्रिबके, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे व रोशन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.